आभाळमाया : चतुरस्र अंतराळयात्री

 [email protected]

अवकाशयात्रा करणाऱ्या अनेक साहसी महिलांची माहिती आपण गेले अनेक महिने घेत आहोत. या प्रत्येक अंतराळयात्रीचे काही ना काही वैशिष्टय़ आहे. प्रत्येकीचं आवडीचं शिक्षण वेगळं आहे, छंद वेगळे आहेत आणि अवकाशयानातील कार्यही वेगळं आहे.

रॉबर्टा बॉण्डर या पहिल्या कॅनेडियन अंतराळयात्री तर अनेक विषयांत पारंगत असलेले व्यक्तिमत्त्व. १९४५ मध्ये कॅनडातील सॉल्ट मेरी येथे जन्मलेल्या रॉबर्टा अंतराळात जाणाऱ्या पहिल्या न्यूरॉलॉजिस्ट (मेंदूतज्ञ) ठरल्या. कॅनडाच्या नागरिक असलेल्या रॉबर्टा  यांचे वडील मूळचे युक्रेनियन आणि आई इंग्लिश घराण्यातली. त्यांच्या घरातच विज्ञानाची ओढ होती. विज्ञानातील प्रयोग करण्याचा छंद असलेल्या रॉबर्टा यांना त्यांच्या वडिलांनी बंगल्याच्या तळघरात एक प्रयोगशाळाच बांधून दिली होती.

अशा वातावरणात बालपण गेलेल्या रॉबर्टा यांनी आधी प्राणिशास्त्र्ा आणि शेती विषयातील पदवी घेतली. त्यानंतर न्यूरोसायन्समध्ये त्यांनी टोरॅण्टो विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली. नंतर त्या एम.डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) झाल्या.

इतके वैविध्यपूर्ण शिक्षण घेऊन प्रत्येक विषयात प्रावीण्य मिळविताना त्यांनी आपले आवडीचे छंदही जोपासले. पॅरॅशूटिंग, स्कायडायव्हिंग या साहसी खेळांबरोबरच त्यांनी छायाचित्रणातही आपले कौशल्य सिद्ध केले. याच काळात त्यांनी कॅनडातील ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ऍण्ड सर्जन्स’ या संस्थेची न्यूरॉलॉजी विषयातील फेलोशिपही मिळवली.

कालांतराने त्यांची कॅनडातील पहिल्या सहा अंतराळवीरांमध्ये निवड झाली. १९८४ पासून या सर्व संभाव्य अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले. १९९२ मध्ये रॉबर्टा यांना ‘नासा’ने ‘डिस्कव्हरी’ या ‘स्पेस शटल’मधून अंतराळयात्री म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्या ‘आंतरराष्ट्रीय मायक्रोग्रॅव्हिटी लॅबोरेटरी मिशन’च्या पे-लोड स्पेशॅलिस्ट होत्या. २२ जानेवारी ते ३० जानेवारी १९९२ या आठ दिवसांच्या काळात त्यांनी याअनुषंगाने अंतराळात विविध वैज्ञानिक प्रयोग केले.

पृथ्वीवर परतल्यावर ‘नासा’च्या संशोधक पथकात त्यांनी दहा वर्षे काम केले. त्यामध्ये मुख्यत्वे अंतराळात जाऊन आलेल्या व्यक्तींच्या आरोग्याविषयीची माहिती संकलित करून अंतराळयात्रेचा मानवी तन-मनावर काय परिणाम होतो याचा सूक्ष्म अभ्यास केला गेला.

हे संशोधन सुरू असताना त्यांनी आपला निसर्ग छायाचित्रणाचा ध्यासही सोडला नाही. कॅलिफोर्नियातील ‘ब्रुक्स इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी’ या संस्थेतून त्यांनी छायाचित्रणाचे उत्तम शिक्षण घेतले होते. त्याचा त्यांना ही कला जोपासताना फायदा झाला. छायाचित्रणात प्रावीण्य मिळवून त्यांनी चार ‘फोटो एसे’ पुस्तके प्रसिद्ध केली. कॅनडातील नॅशनल पार्कवर आधारित ‘पॅशनेट व्हिजन’ हे त्यांचे छायाचित्रांचे पुस्तक गाजले.

रॉबर्टा सातत्याने विविध उपक्रमांशी निगडित राहिल्या. आपला अंतराळ अनुभव हा त्यांच्या व्याख्यानांचा विषय असायचाच, पण एक डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधक, छायाचित्रकार, लेखिका, पर्यावरणवादी अशा अनेक विषयांवर अधिकारवाणीने बोलणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती पसरली. अमेरिका आणि कॅनडामधील रेडिओ आणि टीव्हीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. ‘डेस्टिनी इन स्पेस’ या आयमॅक्स थिएटरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विशाल पडद्यावरच्या चित्रपटात रॉबर्टा यांनी भूमिकाही केली.

२००३ मध्ये रॉबर्टा यांना ट्रेन्स विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविण्याची संधी दोन वेळा मिळाली. पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी त्यांनी २००९ मध्ये ‘रॉबर्टा बॉण्डर फाऊंडेशन’ची स्थापना केली. ना नफा (नॉन प्रॉफिट) तत्त्वावर चालणाऱ्या या संस्थेद्वारे त्यांनी सामाजिक योगदान दिले. अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या बुद्धिवादी आणि साहसी महिलेला कॅनडाच्या ‘वॉक ऑफ फेम’मध्ये ‘स्टार’ सन्मान लाभला हे उचितच म्हणावे लागेल.