लेख : कौतुकाचे चार शब्द

>>दिलीप जोशी<<

[email protected]

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. असेच पावसाळय़ाचे दिवस. पाठीवर हल्ली ज्याला ‘बॅक पॅक’ म्हणतात तशी सॅक घेऊन आमचा २०-२५ जणांचा तांडा डोंगरवाटेला लागलेला. यामधले काही जुने काही नवे. पहाटेची गाडी पकडून खिडकीतून आत येणारा पाऊस अंगावर घेत प्रवास सुरू झाला. नवख्यांची ओळख झाली. मग गप्पा रंगल्या. औपचारिकतेचे बंधन निखळले. नवे मित्र-मैत्रिणी मिळाल्याचा आनंद झाला. कोण काय करते? कॉलेज शिक्षण सुरू आहे की नोकरी? कोण कुठे राहते? हा कितवा ट्रेक? प्रश्नोत्तरे संपत नव्हती. तेवढय़ात कुणीतरी ‘‘आता गाणे’’ असे ओरडले. त्याला तितकाच दणक्यात प्रतिसाद मिळाला. आमचे पहिले गाणे ठरलेले होते- ‘जय जय महाराष्ट्र माझा’. आमच्यातले तीन-चार गायक- गायिकेच्या भूमिकेत असायचे. आम्ही कोरसमध्ये. मग एकेक गाणी सुरू झाली. प्रवास एका टप्प्यावर थांबला. आता पुढे पायी डोंगरवाटेने जायचे. दोन-चार जणांचे गट तयार झाले. सभोवतालची हिरवाई निरखत आणि त्या हिंवस वातावरणात गुरफटत आमची उत्साही पदयात्रा सुरू झाली. रात्र एका डोंगरकपारीतल्या गुहेत. जवळच एक डोह. तिथेच काटक्या गोळा करून स्वयंपाक करायचा असा नेहमीचा शिरस्ता. ज्याच्याकडे शिधा होता त्याची शोधाशोध सुरू झाली. तो जवळच होता. तेव्हा लक्षात आले की, हा सुरुवातीपासून गप्प गप्प आहे. त्याचा भाऊ आमच्या परिचयाचा. तो याला घेऊन आला होता. याने तोंड उघडण्याआधीच तो बोलला, ‘‘हा असाच…मुखदुर्बल. घरीसुद्धा घुम्यासारखा बसून असतो.’’ धाकटा कसंनुसं हसला. पाठीवरचा शिधा उतरवून मुकाटय़ाने कामाला लागला.

रात्री पुन्हा मैफल. गप्पा, गोष्टी, गाणी… हा सगळय़ांना दाद देत स्वतः गप्पच. म्हटले, याच्याशी बोलले पाहिजे. चार दिवसांच्या ट्रेकमध्ये त्याच्याशी चांगली मैत्री झाली. विचारले, ‘‘तू पहिल्यापासून असाच अबोल आहेस?’’ ‘‘मी काय बोलणार! आपण आपले ऍव्हरेज आहोत. दादा हुशार आहे. साहजिकच त्याचे कौतुक होते.’’ त्याचा स्वर कुठेतरी दुखावलेला वाटला. आणखी एका मोठय़ा मित्राला सांगून त्याच्याशी बोललो. ‘‘तुझी आवड काय?’’ ‘‘आवड कसली? आपण ऍव्हरेज आहोत असेच सगळे म्हणतात. तरी पण… कधी कधी गाणे गुणगुणतो.’’ ‘‘म्हणशील काहीतरी?’’ ‘‘नको, उगीच सगळे चेष्टा करतील.’’ ‘‘इथे कोणीही नाही, म्हण…’’ आणि त्याने सुरेल स्वरात एक गाणे म्हटले. आमचे डोळे पाणावले. हा ऍव्हरेज कसा? थोडे प्रोत्साहन मिळाले तर एक्स्ट्राऑर्डिनरी होईल. त्या रात्रीच्या गप्पाटप्पांनंतर त्याने कोणती गाणी म्हणायची हे त्याच्याकडून वदवून घेतले आणि त्याने आत्मविश्वासाने छान गाणी म्हटली. पुढचे दोन दिवस तो सगळय़ांच्या चर्चेचा विषय होता. त्याचा भाऊ म्हणाला, ‘‘याला इतके काही येते हे माहीतच नव्हते. कधी बोलेल तर ना!’’

‘घुम्या’ ठरवल्या गेलेल्या त्याला घरी बोलायची किती संधी मिळत होती कुणास ठाऊक! मग कौतुकाची थाप दूरची गोष्ट. त्या ट्रेकने मात्र त्याचा ट्रक बदलला. तो गाणे शिकला. छोटय़ा कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेऊ लागला. आता पन्नाशीला आलेला तो म्हणतो, ‘‘हे तुमच्यामुळे झाले.’’ आम्ही म्हणतो ‘‘तुला तुझे स्वत्व गवसले.’’

कौतुकाचे चार शब्द माणसाच्या जीवनात किती बदल घडवतात याची ही अनुभवलेली गोष्ट. कौतुक केल्याने आत्मविश्वास असलेला धैर्यधर होतो आणि नसलेल्याच्या मनाला उभारी येते. आमच्या शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत मंचावर उभ्या राहिलेल्या एका मुलीला बोलताच येईना. ‘त-त-प-प’ करत ती खाली बसली. सारे हसले, पण मुख्याध्यापक बाई तिला केबिनमध्ये घेऊन गेल्या. आचार्य अत्रे यांचा ‘मी वक्ता कसा झालो?’ याबाबतचा अनुभव तिला वाचायला दिला आणि म्हणाल्या, ‘‘पुढच्या स्पर्धेत तू चमकतेस की नाही बघ! आतापासून तयारीला लाग.’’ त्या आश्वासक शब्दांनी ती धीट झाली आणि खरोखरच पुढच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली. एखाद्याचे न्यून पाहून त्याला हसणे सोपे आहे. ते दूर करून त्या व्यक्तीला ठामपणे उभे करण्यात खरी कसोटी असते. अनेकांना वेळीच पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे हात लाभत नाहीत. कोणीतरी आपल्याला थोडासा धीर द्यावा एवढीच ज्यांची अपेक्षा असते ती पूर्ण करण्यात कंजूषपणा करू नये. तसे आपल्यालाही अनेक गोष्टी येत असतातच. कुणाच्या तरी सल्ल्याने आणि मार्गदर्शनानेच आपण अनेक कामे करीत असतो. प्रोत्साहन किती उपयुक्त ठरते यावरच्या पाहणीत फुटबॉलपटूंना प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाचा किती फायदा होतो याचा आढावा घेतला तेव्हा ‘चीअर अप’ करणाऱ्या प्रेक्षकांच्या जल्लोषातून ज्यांच्या बाजूने तो जल्लोष होतो त्यांच्या प्रयत्नांचे बळ सुमारे दहा टक्क्यांनी वाढते किंवा त्यांना संघात ‘आणखी एक’ खेळाडू असल्यासारखे जाणवते असा निष्कर्ष काढण्यात आला. प्रेक्षकांनी आपल्या बाजूने जल्लोष केला की, खेळाडू हात उंचावून अभिवादन करतात तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावलेला असतो. थोडक्यात काय तर आपल्या आसपासच्या व्यक्तींचे सुप्त गुण क्वचित जाणवले तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. धीराचे, कौतुकाचे चार शब्द विपरीत परिस्थितीविरुद्ध झुंज देण्याचे बळ देतात. कुसुमाग्रजांच्या कवितेतला ‘तो’ पुराने झालेल्या नुकसानीचा पाढा वाचायला किंवा मदतीची याचना करायला झालेला नसतो. ‘मोडून पडलं सारं तरी मोडला नाही कणा’ ही जिद्द त्याच्यात असतेच. ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’ एवढीच त्याची अपेक्षा असते. असे कुठे जाणवते तेव्हा कुणाचा कणा मोडण्याआधीच पाठीवर हात ठेवावा. तेवढे तरी प्रत्येक जण करू शकतो.