काळ चालला पुढे…

>>दिलीप जोशी<< 

[email protected]

काळ त्याच्या निश्चित गतीने पुढे सरकतच असतो. तो कोणासाठीही थांबत नाही. ‘टाइम ऍण्ड टाइड वेट फॉर नन’ म्हणजे कालगती आणि समुद्राच्या भरती-ओहोटीचे चक्र कुणासाठीही थबकत नाही. ‘काळ’ स्तब्ध झाला तर सारी जीवसृष्टीच धोक्यात येईल. ‘दिवसामागुनी दिवस चालले, ऋतु मागुनी ऋतु’ असं ऋतुचक्र अव्याहत फिरत आहे म्हणून सजीवांचं जीवनचक्रही अबाधित आहे.

घटिका, पळे, तास किंवा सेकंद, मिनिट आणि तास अशी कशीही गणती करा, हे सारं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीशी निगडित आहे. तेवीस तास आणि छपन्न मिनिटांत पृथ्वी स्वतःभोवती (म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती) एक गिरकी घेते आणि आपला एक ‘दिवस’ संपतो आणि दुसरा उजाडतो. इंग्लिश कालगणनेनुसार हा ‘दिवस’ रात्री बारा ते पुढचे चोवीस तास असा असतो तर हिंदुस्थानी पंचांगानुसार तो सूर्योदय ते सूर्योदय असा मानला जातो म्हणूनच उद्या किंवा ‘उदईक’ हे शब्द सूर्याच्या नव्या ‘उदया’शी नातं सांगतात. मग ३६० किंवा ३६५ दिवसांचं वर्ष असं करत बदलत्या संवत्सराचं उत्साहाने स्वागत होत असतं. जगात सध्या व्यावहारिक सोयीसाठी पाश्चात्त्यांचं ‘ग्रेगरियन कॅलेंडर’ सर्वमान्य आहे. त्यानुसार २०१७ हे वर्ष संपून २०१८ चा प्रारंभ झाला आहे. काळाच्या ओघात पाश्चात्त्य कालगणनेत कसा बदल झाला ते गेगरियन कॅलेंडरवरून लक्षात येतं.

इसवी सन १५८२ पर्यंत पाश्चात्त्य जगात ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. बाराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये जे कॅलेंडर प्रचलित होतं त्याच्या वर्षाचा पहिला दिवस २५ मार्च असा होता. १३ वा पोप ग्रेगरी याने १५८२ मध्ये अचूक गणिती नोंद स्वीकारून पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा योग्य काळ स्वीकारला. आधीच्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये तो ३६५ दिवसांपेक्षा थोडा जास्त होता. त्यावेळी २४ फेब्रुवारी हा चार वर्षांनी येणारा ‘लीप डे’ असायचा. पोप गेगरी यांनी नवी सुधारणा स्वीकारून ४ ऑक्टोबर १५८२ नंतरचा दिनांक अकरा दिवसांनी वाढवून एकदम १५ ऑक्टोबर १५८२ असा केला. दर चार वर्षांनी २९ फेब्रुवारीची सोय करून ‘लीप ईयर’ ठरवलं. हळूहळू ही अचूक सौर कालगणना जगाने स्वीकारली. इंग्लंडने ती जवळपास दोनशे वर्षांनंतर म्हणजे १७५२ मध्ये स्वीकारली. त्यामुळे त्यापूर्वीच्या ऐतिहासिक घटनांची नोंद ज्यूलियन कॅलेंडरनुसार झाली असल्याने अनेकदा तारखांचे वाद उद्भवतात. हिंदुस्थानात इंग्रजी राज्य स्थिरावल्यापासून इथेही इंग्लिश कॅलेंडर आलं आणि सजलं. चीनने १९१२ मध्ये पाश्चात्त्य कालगणना स्वीकारल्यावर जगात बहुतेक सर्वांपर्यंत ते पोचलं. सर्वात शेवटी गेगरियन कॅलेंडर स्वीकारणारा देश होता तुर्कस्थान. १९२६ मध्ये त्याने ही कालगणना मान्य केली.

कालगती ही सापेक्ष गोष्ट आहे. आपण पृथ्वीवर राहतो म्हणून २४ तासांचा दिवस. शुक्र ग्रहावर राहायला गेलात तर तिथे सूर्य पश्चिमेला उगवताना दिसेल आणि शुक्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या मंदगतीमुळे त्याचा ‘दिवस’ त्याच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या एका वर्षापेक्षा ‘मोठा’ असल्याचं जाणवेल!

पृथ्वीपुरतंच सांगायचं तर सौर आणि चांद्रमासाच्या संकल्पना विविध संस्कृतीत प्रचलित झाल्या. हिंदुस्थानातील अनेक प्रांतांत वेगवेगळय़ा कालगणना आजही आहेत. त्या चांद्र पंचांगावर आधारित आहेत. अरबी कालगणनाही तशीच. पाश्चात्त्यांचे सगळे सण सूर्याच्या भासमान भ्रमणावर अवलंबून आहेत. आपल्याकडे फक्त मकर संक्रांत हा ‘सौर’ सण आहे. त्यामुळे संक्रांत नेमेचि चौदा (किंवा फार तर पंधरा) जानेवारीला येते. बाकी गणपती, दसरा, दिवाळी यांच्या इंग्लिश कॅलेंडरमधील तारखा मागे-पुढे होतात. याला कारण आपलं चांद्रमासाचं गणित. खोलात न जाता इतकं तरी सगळय़ांनाच ठाऊक असतं की, त्यानुसार वर्ष होतं ते ३६० दिवसांचं. म्हणून दर तीन वर्षांनी ‘अधिक मासा’ची योजना करून सणांचं ‘मागे’ येणं टाळलं जातं. म्हणूनच दिवाळी कधी ऑक्टोबर तर कधी नोव्हेंबरमध्ये येते. अरबी कालगणनेत हा फरक भरून काढला जात नाही.

या सौर आणि चांद्रवर्षाचा मेळ घालण्याचा विचार हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर करण्यात आला. मेघनाद साहा या खगोल भौतिक शास्त्र्ाज्ञाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. साहा यांच्याबरोबर जे.एस. करंदीकर, आर. व्ही. वैद्य असे अनेक अभ्यासक होते. त्यांनी हिंदुस्थानी पंचांग आणि सौर कालगणनेची सांगड घालून आधुनिक सौर कालगणना तयार केली. १९५७ मध्ये हिंदुस्थान सरकारने हिंदुस्थानी सौर दिनांकाला अधिकृत मान्यता दिली. या कालगणनेचा आरंभ २२ मार्च रोजी होतो. २१ मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असल्याने दिवस-रात्र समान असतात. नंतर सूर्याचे (भासमान) भ्रमण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सुरू होते. तो सौरवर्षाचा आरंभबिंदू मानून ‘चैत्र’ महिना येतो. लीप ईयर असेल तर हिंदुस्थानी सौरगणनेनुसार चैत्र महिन्याचा आरंभ २१ मार्चला होतो. लीप वर्ष असेल तर चैत्र मासाचे दिवस ३१ आणि एरवी ३०. त्यानंतरच्या वैशाख ते भाद्रपद या सर्व महिन्यांचे दिवस ३१ आणि अश्विन ते फाल्गुन या महिन्यांचे दिवस नेहमीच ३० असतात. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण असं म्हणतात. हिंदुस्थान सरकारचे हे आधुनिक कॅलेंडर लोकप्रिय मात्र झालेले नाही. आता तर कॉम्प्युटर युगामुळे जागतिक कालगणना गेगरियन कॅलेंडरनुसारच होते आणि तीच आपणही व्यवहारात पाळतो. एरवी आपले मराठी सण पूर्वापार चालत आलेल्या ‘पंचांगा’नुसार येतात. ऋतुचक्र आणि हिंदुस्थानी कालगणनेची सांगड घालण्याचा प्रयत्न साहा यांच्या समितीने केला तरी तो आता सरकारी माध्यमात ‘उद्घोषणा’ (अनाऊन्समेंट) करण्यापुरतच उरला आहे. तात्पर्य काय तर गणना कशीही करा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यातून दिवसरात्र आणि सूर्याभोवती फिरते त्यातून ऋतुचक्र. एरवी काळ ‘सतत’ आहे. त्याला कुठली मोजमापं!

तरीसुद्धा प्रचलित नववर्षाच्या अनेक शुभेच्छा! कारण सद्विचाराला काळाचं बंधन नसतं!