दोन पृथ्वी?

[email protected]

अतिशय उत्कंठेने आणि परिश्रमपूर्वक शोध घेता घेता संशोधकांना अगदी आपल्या ग्रहमालेसारखीच दुसरी ग्रहमाला सापडली. त्याविषयी खगोल विश्वात चर्चा सुरू आहे. ‘टॅपिस्ट-१’ नावाच्या एका ताऱ्याभोवती सात ग्रहांचा गोतावळा आढळला असून तेथे वसतीयोग्य वातावरण असण्याची शक्यता अधिकाधिक बळावत आहे.

एखाद्या ग्रहावर सजीवाची निर्मिती, उक्रांती आणि प्रगती व्हायला ज्या काही मूलभूत नैसर्गिक गोष्टींची गरज असते त्यापैकी हवा-पाणी आणि त्या ग्रहाचे संतुलित तापमान या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपल्याच ग्रहमालेचे उदाहरण घेतले तर नैसर्गिकरीत्या पृथ्वी वगळता अन्य कोणत्याही ग्रहावर सजीवांचा वावर नाही. अतिसूक्ष्म जीव असले तरी अब्जावधी वर्षांत त्यांच्यात जैविक प्रगती, बदल वगैरे घडल्याचा पुरावा नाही. आपणच इथून उठून चंद्रावर आणि मंगळावर जाण्याचे बेत करतोय ती गोष्ट निराळी, पण तिथे कोणी कमानी उभारून आपल्या स्वागतासाठी सज्ज नाही. आपले अन्न-पाणी आणि सुरक्षेची यथास्थित व्यवस्था करूनच चंद्र-मंगळावर जायचे आहे.

या सगळय़ात साहस आणि उत्कंठा नक्कीच आहे. आपल्या वैज्ञानिक प्रगतीला या अधीरतेने बरेच बौद्धिक खाद्यही पुरवलेले आहे. अतिवेगवान अवकाशयाने तयार करून पृथ्वीबाहेर जायला एलॉन मस्कसारखी मंडळी उत्सुक आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही येताना दिसतेय. त्यामुळे १९६९ नंतर चंद्र जसा आपल्याला ‘जवळचा’ वाटू लागला तसाच उद्या मंगळही वाटेल. मग त्यापुढे ही मंडळी गुरू-शनीच्या उपग्रहांवर जाण्याचे मनसुबे रचू लागतील. परंतु आपल्या ग्रहमालेची मर्यादा ओलांडून एखाद्या दूरस्थ ताऱ्याभोवतीच्या ‘पृथ्वी’वर जाण्याची कल्पना तूर्तास तरी अशक्य कोटीतलीच आहे. मात्र अशा एखाद्या ताऱ्याभोवती स्वतंत्रपणे सजीव निर्मिती आणि उक्रांतीही झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातच आता ट्रपिस्ट-१ या ताऱ्याभोवतीच्या सात ग्रहांचा शोध लागल्याने संशोधकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. एकूण सात पृथ्वीसदृश ग्रह असलेल्या या ताऱ्याच्या एका तरी ‘पृथ्वी’वर हवा, पाणी, वातावरण, सूक्ष्म सजीव असू शकतो. त्या दृष्टीने शोध घेता घेता या ताऱ्याभोवतीच्या सप्तग्रहांपैकी ‘डी’ आणि ‘ई’ या ग्रहांकडे ‘हॅबिटेबल’ म्हणजे वसतीयोग्य ग्रह म्हणून पाहिले जातेय. ट्रपिस्ट-१ हा वृद्ध व मंद तारा आहे. त्याच्याभोवतीच्या ग्रहांना प्रखर उष्णतेचा त्रास होत नाही. तरीसुद्धा जवळच्या ग्रहांवरचे तापमान १२६ अंश ते उणे १०६ अंश सेल्सियस असे आहे. या ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते कधी त्यांच्या जनक ताऱ्याच्या खूप जवळ तर कधी खूप दूर असतात. परिणामी तापमानात बराच फरक पडतो. पृथ्वीवरही तापमानातला बदल ऋतुमानाप्रमाणे जाणवतोच, पण तो सजीवांच्या वाढीसाठी सुसहय़ असतो. वाळवंटात ५० अंशापर्यंत जाणारे तापमान ध्रुवीय प्रदेशात उणे ४० पर्यंत जातेच, पण त्या त्या परिस्थितीशी जुळवून तिथली माणसे आणि पशु-पक्षी, जलचर राहतात.

ट्रपिस्ट-१च्या ‘डी’ आणि ‘ई’ या ग्रहांवरचे वातावरण सजीवांच्या उक्रांतीसाठी खूपच योग्य असते तर तिथेही मोठे व कदाचित प्रगत सजीव आढळले असते. मात्र ते वातावरण सजीवांना पोषक असेल तर दुसरीकडचे प्रगत जीव तेथे वस्ती करू शकतात. आपण जशी चंद्र-मंगळावर जाण्याची स्वप्नं बघतो तशीच दुसऱ्या ‘सूर्यमाले’तल्या हॅबिटेबल ग्रहांवर जायची स्वप्नं पाहणारे प्रगत जीव आणखी कुठे असतील? आपल्याप्रमाणेच त्यांनाही ट्रपिस्ट-१ आणि त्याभोवतीच्या ग्रहांची माहिती असेल? ठाऊक नाही. पण तशी शक्यता नाकारता येत नाही. अंतराळ संशोधनाच्या आगामी काळात असे कुणी सापडलेच तर विविध ग्रहमालांवरच्या सजीवांची स्पर्धा सुरू होईल. सध्या मात्र ही कविकल्पना आहे.