लेख : ज्ञानयोगी

>>दिलीप जोशी<<

[email protected]

भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती आहे. महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रही म्हणून निवड केलेले विनोबा ज्ञानयोगी होते. आयुष्यभर ते नवीन काही शिकत राहिले. नवे प्रयोग करत राहिले. विनोबांनी सर्व धर्मांचा साकल्याने अभ्यास केला आणि आपली मतं व्याख्यानांतून, पुस्तकांतून मांडली. भगवद्गीतेमध्ये त्यांनी भक्तियोग बघितला आणि ‘गीताई’ या अत्यंत सोप्या भाषेतील काव्याची निर्मिती केली. जडजंबाल शब्दांत लेखन करण्यापेक्षा सोप्या शब्दांत मोठा आशय प्रकट करणारं काही लिहिणं कठीण. विनोबांचं लिहिणं, बोलणं जनसामान्यांना सहज समजेल असं असे. श्रीकृष्णाला त्यांनी योगेश्वराच्या रूपात पाहिलं. गीतेमधल्या ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणी, नैनं दहती पावकः’ या श्लोकाचं रूपांतर विनोबांनी ‘शस्त्र न चिरिति यास, ह्यास अग्नी न जाळितो’ असं आत्म्याच्या अविनाशी स्वरूपाचं सोप्या शब्दांत वर्णन केलंय.

विनोबा आणि त्यांचे दोन्ही बंधू यांना ज्ञानसाधनेचा वारसा त्यांची आई आणि वडिलांकडून लाभला. त्यांचे वडील तर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रयोगशील विज्ञानवादी पद्धतीने काम करत होते. त्यांनी कानपूरमध्ये रंग रसायनशास्त्र शिकून घेतले. त्या काळी मुलांची शाळेची पुस्तकं ज्या रुमालात (दप्तरात) बांधून नेली जात त्यावर रंगीत मूळाक्षरे चितारून मुलांना अक्षरओळख अगदी सहजतेने कशी होईल याचा विचार केला. त्यांची ही युक्ती विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरली. बडोदे येथे रंगभुवनातून रंगविद्येचे ज्ञान मिळवल्यानंतर नरहर भावे यांनी रंग विषयाचा इंग्रजी-मराठी कोषही लिहिला. त्यानंतर त्यांनी मराठी आणि गुजराती व मोडी लिपीचे लाकडी टाइप (ठोकळे) बनवले. त्याकाळी लाकडी ‘टाइपां’वर कागद ठेवून हाती छपाई होत असे. त्यानंतर त्यांनी संगीताच्या अभ्यासात लक्ष घालून शेख राहतअली यांच्या ठुमरींचा संग्रह प्रकाशित केला आणि त्याला ग्वाल्हेरच्या संस्थानचं पारितोषिक मिळालं. सामाजिक समतेच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आपल्या घराण्याचे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी 1929 पासून प्रयत्न केले. उत्तम आरोग्यासाठी आहारशास्त्राचा अभ्यास करून त्यावर नरहर भावे प्रयोग करत असत.

हे विस्ताराने सांगण्याचे कारण पुढे ज्ञानयोगी झालेल्या विनोबांच्या जडणघडणीत नरहर भावे यांच्या ज्ञान-विज्ञानाचा विचार करण्याच्या वृत्तीचा प्रभाव निश्चितच असणार. आपले तिन्ही पुत्र अविवाहित राहून गांधीजींच्या चळवळीत गेले याबद्दल कोणीतरी विचारल्यावर नरहर भावे उत्तरले ‘‘मुलं जाणती आहेत आणि आपल्या जीवनध्येयाचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या जीवनाचे हित त्यांना समजते.’’ गांधीजींनी विनोबांच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, ‘‘मी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर जी आत्मिक उन्नती प्राप्त करू शकलो ती आपल्या मुलाने तरुण वयातच मिळवली आहे.’ स्वतः विनोबांनी ‘आमचे वडील योगी होते’’ असं म्हटलं आहे.

विनोबा आणि त्यांचे वडील व भावंडंसुद्धा ज्ञानयोगी होती. विठ्ठलाच्या आरतीमध्ये ‘केशवासी नामदेव, भावे ओवाळिती’ या ओळीचा अर्थ लावताना विनोबांचे बंधू शिवाजीराव म्हणाले ‘‘इथे नामदेव स्वतःला सर्व वारकऱ्यांमध्ये पाहत आहेत. ते सर्वाकार झाले आहेत.’’ अशा प्रकारे हे सर्वच भाऊ आगळा-वेगळा विचार करणारे होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विनोबा सक्रिय राजकारणापासून दूर गेले. त्यांनी ‘सर्वोदय’ चळवळ सुरू केली. भूदानासारखा भूमिहीनांना जमीन देणारा अनोखा विचार मांडला. त्यासाठी ते हजारो मैल पायी फिरले. असं म्हणतात की, त्यांची पदयात्रा सुरू असताना नेहरूंनी त्यांना हेलिकॉप्टर वापरण्याविषयी सुचवले तेव्हा विनोबांनी मिश्किलपणे उत्तर दिलं, ‘‘जमीन मागायची आहे म्हणून पायी चालत निघालोय. हवा मागायची असेल तेव्हा विमानाने जाईन!’’

यातला गमतीचा भाग सोडला तरी विनोबांच्या देशभरातील पदयात्रेने जागतिक विक्रम केला. हजारो एकर जमीन दान म्हणून मिळाली आणि ती भूमिहीनांना वाटण्यात आली. याच पदयात्रेत चालत असताना विदेशी पत्रकारांकडून विनोबा अनेक भाषा शिकले. पंजाबमध्ये घुमान येथे पदयात्रा पोहोचल्यावर तेराव्या शतकात पदयात्रा करतच आलेल्या संत नामदेवांचं स्मरण विनोबांना झालं आणि त्या दिवशी संध्याकाळच्या प्रवचनात ते म्हणाले, ‘मला आज नामदेव सोबत असल्यासारखं वाटतंय. जगज्जेत्या सिकंदराला शस्त्राने पंजाब जिंकता आला नाही. आमच्या संत नामदेवांनी तो प्रेमाने जिंकला!’ शिखांच्या पवित्र ‘ग्रंथसाहेब’मध्ये संत नामदेवांचे एकसष्ट अभंग समाविष्ट झाले!

विनोबांनी राजकारणापासून विज्ञानापर्यंत  सर्व गोष्टींवर विचार केला. ‘आत्मज्ञान आणि विज्ञान’ या 1945 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांना पुढच्या काळातील ‘विज्ञानयोग’ दिसला. तसं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. सामाजिक बाबतीत त्यांनी स्त्री-शक्तीचे महत्त्व जाणले. परंपरागत पुरुषप्रधान विचारसरणीने स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणत ‘‘ईश्वराला किंवा संतांनाही भक्तिभावाने ‘माऊली’ म्हटलं जातं. दया, क्षमा, करुणा हे सारे शब्द स्त्र्ााrलिंगी आहेत. कारण या शक्ती प्रामुख्याने स्त्रियांमध्येच असतात. पुत्रप्राप्तीने स्वर्ग मिळतो हा भ्रम आहे.’’

विनोबांनी त्यांच्या सर्वोदय चळवळीत स्त्रियांचे महत्त्व जाणले. महिलांचा मोठय़ा सहभाग त्यामुळे चळवळीला लाभला. विचारशील आणि कृतिशील विनोबांनी भगवद्गीतेला ‘गीताई’ म्हटले. या पुस्तिकेच्या चाळीस लाखांहून अधिक प्रती संपल्या. मराठी पुस्तकांच्या खपातला हा उच्चांक असेल.

अर्थात विनोबांनी ‘आणीबाणी’ला ‘अनुशासन पर्व’ म्हणताच त्यावर कठोर टीका झाली. त्यांचे शिष्य जयप्रकाश ‘सर्वोदय’ सोडून पुन्हा राजकीय पटलावर आले. विनोबांची भूमिका त्यांच्या अनेक चाहत्यांनाही पटली नाही. त्यावर विनोबांनी टीका सहन करत मौन बाळगलं. असे काही प्रसंग वगळता विनोबा ज्ञानयोगी म्हणूनच जगले.