लेख : भावशून्य शब्द जेथ…

>>दिलीप जोशी<<

[email protected]

घरातल्या एखाद्या लहान मुलाला कोणी खाऊ दिला तर आपण मोठी माणसं म्हणतो, ‘‘थँक यू म्हण…’’ आणि ते मूलही अगदी बोबडय़ा बोलांनीसुद्धा ‘‘थँक यू’’ वगैरे म्हणतं. जगात जिथे जिथे म्हणून इंग्रजांची राजवट रुजली त्या सर्व ‘कॉलनी’मधली व्यवहाराची रीत त्यांच्याप्रमाणे बरीचशी बदलली. कोणी ‘‘थँक यू’’ म्हटलं की, ‘‘नो मेन्शन’’ म्हणावं असं आमच्या लहानपणी कुठून तरी ऐकलं तेव्हा गंमत वाटली होती. आता ‘‘थँक्स’’ म्हटलं की, ‘‘यू आर वेलकम’’ म्हणतात. कदाचित शिष्टाचाराच्या प्रथा इंग्लंडमधून अमेरिकेकडे गेल्याचा हा परिणाम असावा. ‘मॅनर्स’, ‘एटिकेटस्’ किंवा चारचौघांत वागण्याचे शिष्टाचार सर्वच समाजात या ना त्या प्रकारचे असतातच. जर्मन भाषेतही ‘‘डॉक शोन बीट शोन’’ आणि फ्रेंचमध्ये ‘‘मेर्सी’’ (थँक्स) असतंच. एकूणच हा पाश्चात्य ‘मॅनरिझम’. पूर्वी आपल्याकडे ट्रेनमधली माणसं गर्दीत चुकून एखाद्याला धक्का लागला तरी लगेच एका हाताने ‘‘नमस्कार’’ करत. हे सौजन्य, सौहार्दाचं आणि नकळत झालेली चूक मान्य करण्याच्या उदारतेचं लक्षण. आता त्याऐवजी ‘सॉरी’ म्हटलं जातं.

औपचारिक का होईना, पण सुखावह शब्दांची पखरण संभाषणात मार्दव आणते. मात्र त्याचा अतिरेक झाला की त्यातली सहजता जाऊन एक प्रकारचा कृत्रिमपणा येतो. ‘प्लीज’, ‘थँक्स’ आणि ‘सॉरी’ हे शब्द तर आपल्या संभाषणाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यात आता ‘वाव्!’ ‘ग्रेट!’ ‘कूल!’ ‘चिल!’ अशा तरुणाईच्या नित्यनव्या शब्दांची भर पडत आहे. फोनवरील संवादात ‘इमोजी’ टाकून भावना व्यक्त केल्या जातात तसंच या एका शब्दातील उच्चाराचं असतं. ‘टेन्शन नको घेऊ… चिल् यार’ अशी वाक्यं तर आसपास सतत ऐकू येत असतात.

मग पूर्वी औपचारिक आभारांच्या जागी काय असायचं? आमच्या मागच्या पिढीत म्हणजे साठेक वर्षांपूर्वी कोणी कोणाला सारखं ‘‘थँक्स’’, ‘‘सॉरी’’ म्हटल्याचं आठवत नाही. कोणी काही भेटवस्तू दिली, कौतुक केलं तर लहान मुलांना सरळ पाया पडून नमस्कार करायला सांगितलं जायचं. बाकी औपचारिक आभार किंवा चुकलं तर अपराधाची भावना बहुधा नजरेतूनच व्यक्त व्हायची. आमचे एक मास्तर (सर) होते. भयंकर तापट, पण तितकेच प्रेमळ. एकदा ते केवळ गैरसमजातून वर्गातल्या एका मुलाला बरंच काही बोलले. तो रडायला लागला. मास्तर बोलले म्हणून नव्हे, तर आवडते गुरुजी विनाकारण संतापले म्हणून. त्यामुळे घरी गेल्यावर त्याला चक्क ताप भरला. दुसऱ्या दिवशी मास्तरांनाही समजलं की, आपण त्या मुलाला उगाच रागावलो. त्याची काहीच चूक नव्हती. शाळा सुटल्यावर ते तडक त्याच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला पोटाशी धरलं. गुरुशिष्यांच्या डोळय़ांतल्या पाण्याने निःशब्द भावना व्यक्त झाल्या आणि गैरसमज वाहून गेले. हे सगळं केवळ औपचारिकतेच्या पलीकडचं होतं. अन्यथा मुंबईच्या प्रवासात एखाद्याने औपचारिक ‘‘सॉरी’’ म्हटलेलं दुसरा मान्य करतोच असं नाही. मग ‘‘म्हटलं ना सॉरी, आता काय?’’ असा पहिल्याचा सूर असतो. यात शाब्दिक कसरत असते, सौहार्द कसं निर्माण होणार?

याचा अर्थ ‘‘थँक्स’’ किंवा ‘‘सॉरी’’ म्हणू नये असं अजिबात नाही. त्या शब्दांशी प्रामाणिक राहून ते उच्चारले तर ऐकणाऱ्याच्याही मनाला भिडतात, पटतात. त्यात केवळ उपचाराचा कोरडेपणा नसावा. तो असला की ‘‘थँक यू’’ म्हटल्यावर ‘‘यू आर वेलकम’’ची अपेक्षाही मनात येते, पण हे असं औपचारिक बोलणं बहुधा व्यावसायिक नातेसंबंधात, कामाच्या ठिकाणी अधिक असतं. एरवी दोन मित्र परस्परांचा कौतुकाचे ‘उद्धार’ करतसुद्धा फोनवर बोलत असतात. नातं जितकं घट्ट तेवढी औपचारिकता कमी होत जाते. आईने काही दिलं तर ‘‘थँक्स’’ म्हणतो? नाही ना! कारण त्यात प्रेम, वात्सल्याची निःशब्द देवाणघेवाण आपोआप घडते. आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरून आणि नजरेतून आपल्याला कौतुकाचे किंवा रागाचे भाव समजत असतात. औपचारिक शब्दांचा आधार न घेताच जगातल्या अनेक ठिकाणी ‘शब्देविण संवादु’ होत असतो. जगभरच्या अनेक भाषांपैकी सहा ते सात हजार बोलींमध्ये ‘आभार’, ‘धन्यवाद’, ‘क्षमस्व’ असे औपचारिक शब्द नाहीत, पण त्यांचे भावनिक व्यवहार इतरांसारखेच सक्षम आहेत. बरं, औपचारिकता ही प्रत्येक वेळी उपयोगी पडतेच असंही नाही.

हे सारं सुचण्याचं कारण म्हणजे, सध्या तरुणाईला आवडणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या टीव्ही मालिकेचा बोलबाला आहे. मी काही ती सगळी पाहिलेली नाही, पण त्यामध्ये ‘‘डोथ्राकी’’ ही  ‘‘थँक यू’’ मुक्त भाषा आहे असं ऐकलं. त्यातले पाश्चात्य (वेस्टेरोस) आणि पौर्वात्य (इस्टेरोस) यापैकी पौर्वात्यांना ‘आभार मानणं’ नावाचा प्रकारच ठाऊक नसतो असं दाखवलंय म्हणे.

भाषा बिनआभाराच्या शब्दांची असली म्हणजे ती भावनाशील नसते असं कोणी सांगितलं? अनेकदा माणसं माणसांना दिलासा देताना ‘‘काही सांगू नको, सगळं समजलंय’’ असं म्हणतात तेव्हा ‘‘ये हृदयीचे ते हृदयी’’ आपोआप पोचलेलं असतं, परंतु बदलत्या काळातले शिष्टाचार नकळत वागण्या-बोलण्यात येतातच. त्यात दोष कोणाचाच नाही. ते भावनाशून्य असू नयेत इतकीच अपेक्षा असते. आमच्या परिचयातला एकजण तर अनेक वर्षांची ओळख असूनही कणभर चहा दिला तरी ‘‘थँक यू व्हेरी मच’’ असं इतकं औपचारिकतेने म्हणतो की, त्या चहापानाची गंमतच जाते. एकदा कोणीतरी त्याला म्हटलं ‘‘अरे, असं बोलून तू सगळा मजा किरकिरा कर दिया यार’’. त्यावर तो अधिकच अवघडून म्हणाला, ‘‘ओह! माझा तसा उद्देश नव्हता, आय ऍम सॉरी, रियली सॉरी, एक्स्ट्रिमली सॉरी!’’… आता बोला!