एकसष्टीनिमित्त दिलीप वळसे-पाटील यांचा मान्यवरांकडून सन्मान

सामना ऑनलाईन । मुंबई

राजकारणात असून अतिशय प्रामाणिक आणि सद्गुणांनी भरलेली व्यक्ती. राज्याला आणि देशाला दिशा दाखविणारे निर्णय त्यांनी घेतले. सत्तेत असो वा विरोधात, सत्ताधारी आणि विरोधक असा योग्य समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीप वळसे-पाटील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना गौरविले.

दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलेल्या आठवणी, रिपाइंचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी उडवून दिलेला हास्यकल्लोळ आणि नितीन गडकरी यांच्या टीकाटिप्पणीने चौफेर रंगलेल्या या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्या कारकीर्दीविषयी स्तुतिसुमने उधळण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, मंत्री दिवाकर रावते, प्रकाश मेहता, राज्यमंत्री दीपक केसरकर, अजित पवार, सुनील तटकरे, शेकाप नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे असे सर्व पक्षांतील मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शुभशकुन आणि पवारसाहेब

शरद पवार यांनी यावेळी दिलीप वळसे-पाटील यांचे कडील दत्तात्रय पाटील यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. पवार म्हणाले, दत्तात्रय पाटील एक दिवस मला भीमाशंकरला घेऊन गेले. तेव्हा मी उद्योगमंत्री होतो. रात्री माझ्या अंगावरून काहीतरी सरपटत गेल्याचे जाणवले. कंदील लावून पाहिला तर तो साप होता. तेव्हा दत्तू पाटील यांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या. यांना आनंद का झाला असा प्रश्न मला पडला. तेव्हा ते म्हणाले, हा तर शुभशकुन आहे. मी परत आलो तेव्हा उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आठच दिवसांत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असेही शरद पवार म्हणाले.

‘इथे जमले आहेत सर्व पक्षाचे नेते सहा, दिलीपरावांकडे उघडय़ा डोळ्याने पहा’, ‘जे खेळले नाहीत कधीच राजकीय डाव, तेच आहेत लाडके दिलीपराव’
– रामदास आठवले

विधानसभेत जेव्हा तणावाचे प्रसंग यायचे तेव्हा सरळ बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यायचे असा त्यांनी मला दिलेला सल्ला आजही मी पाळतो. त्याचा मला फायदा होतो.
– देवेंद्र फडणवीस