कोहलीला आत घेतले म्हणून मला बाहेर काढले

सामना क्रिडा प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघात विराट कोहलीला स्थान दिल्यामुळे मला निवड समिती प्रमुखपदावरून काढून टाकण्यात आले, असा गौप्यस्फोट हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मुंबईत बुधवारी झालेल्या मुंबई पत्रकार संघाच्या क्रीडा पत्रकार सोहळ्यात केला. विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानच्या ज्युनियर संघाने युवा वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली होती. तसेच तो फलंदाज म्हणूनही चमकदार कामगिरी करीत होता. त्यामुळे २००८च्या हिंदुस्थानच्या श्रीलंकन दौऱ्यात विराट कोहलीने पदार्पण करावे असे वाटत होते. इतर चार निवड समिती सदस्यांनीही माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला होता, असे दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले.

धोनी, कर्स्टन यांचा विरोध

कर्णधार महेंद्रसिंग धोनी व प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी विराट कोहलीच्या प्रवेशाला विरोध केला होता. विराट कोहलीची फलंदाजी अद्याप बघितली नसल्याचे दोघांकडून सांगण्यात आले. पण मी माझ्या मतावर ठाम होतो. विराट कोहली छान फॉर्ममध्ये असून त्याला आता संधी देणे योग्य ठरेल, असे दिलीप वेंगसरकर यांनी दोघांना सांगितले.

श्रीनिवासन यांना बद्रीनाथ हवा होता

महेंद्रसिंग धोनी, गॅरी कर्स्टन यांच्यासह बीसीसीआयचे त्यावेळचे खजिनदार एन. श्रीनिवासन यांना विराट कोहलीऐवजी एस. बद्रीनाथ टीम इंडियात हवा होता. त्यावेळी एन. श्रीनिवासन चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल संघाशी जोडले होते. तसेच महेंद्रसिंग धोनी त्या संघाचा कर्णधार होता. शिवाय एस. बद्रीनाथही त्या संघात होता. त्यामुळे एस बद्रीनाथला हिंदुस्थानचे तिकीट मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत होते.

…आणि श्रीकांत निवड समितीवर आले

२९ वर्षीय एस. बद्रीनाथला संधी केव्हा मिळणार, असे एन. श्रीनिवासन यांनी विचारले. त्यावेळी मी म्हणालो, संधी मिळेल, पण ती केव्हा हे आताच सांगू शकणार नाही. त्यानंतर श्रीनिवासन कृष्णम्माचारी श्रीकांत याला घेऊन त्यावेळचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले. मला पदावरून काढून टाकण्यात आले आणि कृष्णम्माचारी हे अध्यक्ष झाले.