तामीळनाडूत अण्णा द्रमुकला धक्का; दिनाकरन विजयी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अरुणाचल प्रदेशमधील दोन, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडूतील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. तामीळनाडूत आर. के. नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व्ही. के. शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांनी विजय मिळवून सत्ताधारी अण्णा द्रमुकला धक्का दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सबंग मतदारसंघातून काँग्रेसकडून जागा खेचून विजय हस्तगत केला, तर अरुणाचल प्रदेशात दोन जागांवर भाजपने काँग्रेसवर विजय मिळवला आहे. या दोन्ही जागा पूर्वी काँग्रेसकडे होत्या, तर यूपीमध्ये कानपूर जिह्यात ‘सिंकद्रा’ची जागा राखण्यात भाजप यशस्वी झाला आहे.

आर. के. नगर हा मुख्यमंत्री जयललिता यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत दिनाकरन यांना ८९ हजार १३, अण्णा द्रमुकचे ई. मधुसूदन यांना ४० हजार ७०७ तर द्रमुकचे एन. मुरुथू गणेश यांना २४ हजार ६५१ मते मिळाली.

उत्तर प्रदेशात कानपूर देहात जिह्यातील ‘सिंकद्रा’ मधून भाजपचे अजितसिंग पाल यांना ७२ हजार २८४ (४४.८६टक्के), त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी सपाच्या सीमा सचन यांना ६१ हजार ४२३ मते (३७.८० टक्के), काँग्रेसचे प्रभाकर पांडये यांना १९ हजार ८४ मते मिळाली. गतवर्षी उत्तर प्रदेशची विधानसभेची निवडणूक सपा आणि काँग्रेसने युती करून लढवली होती.

ईव्हीएमचे सील तोडल्याचा आरोप
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) सील तोडण्यात आलेली आहेत असा आरोप मतमोजणी सुरू असताना काँग्रेस, सपा उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केला. यामुळे मतमोजणी केंद्रात एकच गोंधळ उडाला. भाजप उमेदवार विजयी व्हावा यासाठी जाणूनबुजून ईव्हीएममध्ये सरकारी अधिकाऱयांनीच हेराफेरी केल्याचा आरोप या प्रतिनिधींनी केला.