कॅच सुटला, चेंडू डोक्यावर आदळला अन् काळजाचा ठोका चुकला, हिंदुस्थानचा गोलंदाज जखमी

9


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज आणि बंगालचे प्रतिनिधित्व करणारा अशोक डिंडा सोमवारी सराव सामन्यादरम्यान डोक्यावर चेंडू लागून जखमी झाला. कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बंगालच्या संघाचा सराव सामना सुरू असताना स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेताना डिंडा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुखापत गंभीर नसल्याचे कळते.

बंगालच्या संघातील एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, सराव सामन्यादरम्यान फलंदाज वीरेंद्र सिंगने डिंडाच्या गोलंदाजीवर जोराचा फटका मारला. यावेळी अशोक डिंडाने झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातून चेंडू निसटून थेट डोक्याला लागला. यामुळे डिंडा मैदानावरच कोसळल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. परंतु डिंडाची दुखापत गंभीर नसली तरी त्याला दोन दिवसांच्या विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

डिंडाने हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडून 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 12 बळी घेतले आहेत. तर 9 टी20 सामन्यात 17 बळी घेतल्या आहेत. कामगिरीत सातत्य नसल्याने त्याचा संघात आतबाहेर प्रवास सुरू राहिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या