दिंडोरीतील रासायनिक पदार्थांची कंपनी उद्ध्वस्त

6

सामना ऑनलाईन । मुंबई

क्लोरल हायड्रेड हा अत्यंत घातक व विषारी रासायनिक पदार्थ राज्यातील ताडी विक्रेत्यांना विकून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोघांचा गोरखधंदा पोलीस निरीक्षक दया नायक व आरे पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या पथकाने नाशिकच्या दिंडोरी येथील एका कंपनीत छापा मारून तब्बल 70 लाख किमतीचा क्लोरल हायड्रेडचा साठा जप्त करून कंपनी मालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ तसेच त्यांचे पथक आणि आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीत एका धडक कारवाई करीत ताडी विक्रेत्यांना देण्यासाठी आणलेला 80 गोण्यांमध्ये असलेला 2240 किलो वजनाचा क्लोरल हायड्रेड या बंदी असलेल्या रासायनिक पदार्थाचा 45 लाख 34 हजार 300 किमतीचा साठा जप्त केला होता. त्यावेळी व्यंकटा रामणय्या शंकरय्या करबुजा, बुनियाद अहमद गुलाम रसूल अन्सारी आणि राजन्ना व्यंकन्ना बुसरपू यांना अटक केली होती. या आरोपींच्या तपासात प्रकाश ऊर्फ पप्पू जेठाभाई गोपवाणी याचे नाव पुढे आले. गोपवाणी याच्याकडूनच क्लोरल हायड्रेडचा साठा मागवला असल्याचे व्यंकटा याने चौकशीत सांगितले. आरे पोलीस ठाण्याच्या पथकाने मालाड येथे गोपवाणीला अटक केली.

क्लोरल हायड्रेडची कंपनी उद्ध्वस्त

दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी येथे दिलीप जाधव याची अल्फा सॉलव्हंट नावाची कंपनी असून तेथे क्लोरल हायड्रेड हा रासायनिक  पदार्थ बनवून तो राज्यात ताडी विक्रेत्यांना वितरित केला जात असल्याची खबर दया नायक यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दया नायक व आरे पोलिसांचे पथक यांनी दिंडोरी येथील अल्फा सॉलव्हंट कंपनीत धडक देऊन तपासणी केल्यावर तेथे तब्बल 3500 किलो वजनाचा व 70 लाख किमतीचा क्लोरल हायड्रेडचा साठा मिळाला. पोलिसांनी हा साठा जप्त करून कंपनीचा मालक दिलीप जाधव याला अटक केली.

ताडीतून नागरिकांच्या जिवाशी खेळ

क्लोरल हायड्रेड हा अत्यंत घातक रासायनिक पदार्थ आहे.  क्लोरल हायड्रेडवर शासनाने बंदी घातली आहे, मात्र तरीही या विषारी रासायनिक पदार्थाचा बेकायदेशीरपणे ताडी बनविण्यासाठी वापर केला जात होता. यापूर्वीदेखील सातारा पोलीस व एक्साइज विभागाने कारवाई करून दिलीप जाधव याला पकडले होते, मात्र तरी त्यानंतरही दिलीप जाधव याने क्लोरल हायड्रेड ताडी विक्रेत्यांना देण्याचे काम सुरूच ठेवले होते. त्याला आता विजयालक्ष्मी हिरेमठ व दया नायक यांच्या पथकाने दणका दिला आहे.