चायनिज, थाय फूड खाणं होणार अधिक महाग

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता पैसे त्याची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. याचा मोठा प्रभाव हॉटेलमधील पदार्थांवर झाला असून ग्राहकांना अधिक पैसे घेऊन जाणे गरजेचे आहे. हॉटेल मालकांना बाहेरून मागवण्यात येणाऱ्या वस्तू आणि पदार्थांवर बदलत्या नियमांनुसार अधिक कर भरावा लागणार आहे.

नव्या कर रचनेनुसार सीमा शुल्कामध्ये वाढ झाली आहे. चायनिज आणि अन्य विदेशी हॉटेलमध्ये अनेक पदार्थ असे आहेत की ज्यासाठी लागणारे पदार्थ, मसाले विदेशातून आणाव्या लागतात. आता आयात केल्या जाणाऱ्या या पदार्थांवर सीमा शुल्क २० टक्क्यांवरून ३५ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे हे पदार्थ बनवण्यासाठी येणारा खर्च ३० टक्क्यांवरून ५० टक्के वाढणार आहे. अर्थात पदार्थांचे दर वाढून ग्राहकांच्याच खिशाला चटका बसणार आहे.

अनेक पदार्थ असे आहेत की ज्यांच्यासाठी लागणारे सामान परदेशातूनच आणावे लागते. आता त्यांची किंमत वाढेल. पर्यायाने आम्हाला किंमती वाढवण्याशिवाय अन्य पर्याय उरणार नाही, असे इंप्रेसेरिओ हॉस्पिटॅलीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रियाज आमलानी यांनी सागितले.