कुंदन शहा

‘जाने भी दो यारों’, ‘कभी हां कभी ना’ यासारखे सुपरडुपर हिंदी चित्रपट असोत किंवा छोटय़ा पडद्यावरील ‘नुक्कड’, ‘वागले की दुनिया’ या अजरामर मालिका असो, त्यांचे दिग्दर्शन हे कुंदन शहा यांचे होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी एका लेखक आणि दिग्दर्शकास मुकली आहे. त्यांच्या चित्रपटांनी अथवा मालिकांनी दर्शक आणि प्रेक्षकांना निखळ हास्यविनोदाचा आनंद दिला.

‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ या दोन मालिका हिंदुस्थानी टेलिव्हिजनच्या इतिहासात शहा यांच्या कुशल आणि अभिजात दिग्दर्शनाने अजरामर झाल्या. फुटपाथवरील आयुष्यावर बेतलेली ‘नुक्कड’ असो किंवा मध्यमवर्गीयांच्या काटय़ावर चालणाऱ्या जीवनाचे चपखल चित्रण करणारी ‘वागले की दुनिया’ ही मालिका असो, या दोन्ही मालिका कसदार दिग्दर्शनाने विलक्षण लोकप्रिय ठरल्या. दोन्ही मालिकांचे लेखन, मालिकेतील कलावंतांचे दमदार सादरीकरण हे तर उत्कृष्ट होतेच. ‘ये जो है जिंदगी’ या खुसखुशीत हास्य मालिकेने निखळ हास्य विनोदाचा दर्शकांना आनंद दिला होता. मालिकेतील बहुतेक सर्व पात्रे ही मध्यमवर्गीय, सर्वसामान्य स्तरावरचीच टिपलेली आहेत किंवा ‘नुक्कड’मधील रस्त्यावरची माणसे तर जवळपास वाया गेलेलीच होती, पण त्या पात्रांच्या माध्यमातून शहा यांनी सामान्य तरुण माणसांचे एक उत्तम अंतरंग, त्यातील चांगुलपणा प्रभावीपणे समोर आणला होता. ‘वागले की दुनिया’ ही मालिका प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कार्टून’वर आधारित होती. पडदा – मग तो छोटा असो की मोठा असो- शहा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाती घेतले ते मनःपूर्वक पूर्ण केले आणि दर्शकांना कायम निखळ साहित्यकृतीचा आनंद मिळवून दिला.

‘जाने भी दो यारों’, ‘कभी हां कभी ना’, ‘क्या कहना’, ‘हम तो मुहब्बत करेगा’, ‘दिल है तुम्हारा’ ते २०१४ चा ‘पी से पीएम तक’ या शेवटच्या चित्रपटापर्यंत शहा यांचे दिग्दर्शन होते. कुंदन शहा यांच्या दिग्दर्शनाच्या चोवीस वर्षांच्या इतिहासात सात चित्रपट वैशिष्टय़पूर्ण ठरले. त्यातील दोन सुपर-डुपर चित्रपट म्हणजे ‘जाने भी दो यारो’ आणि ‘कभी हां कभी ना’ हे होत. ‘दिल ने कहा’ या चित्रपटात रेखा असूनही फार चर्चा झाली नाही किंवा सिनेसमीक्षकांनी म्हणावी तशी चर्चा केली नाही. याचा अर्थ शहा यांच्या दिग्दर्शनात कमीजास्तपणा होता, असेही म्हणता येणार नाही.

१९ ऑक्टोबर १९४७ रोजी जन्म झालेल्या शहा यांचा येत्या १९ तारखेस सत्तरावा वाढदिवस होता, पण नियतीने मात्र त्यांना त्याआधीच आपल्यामधून हिरावून घेतले. शहा यांनी पुण्यात फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते. या शिक्षण आणि प्रशिक्षणाचाही लाभ त्यांना हिंदी सिनेमा आणि छोटय़ा पडद्यावरील मालिकांचे दिग्दर्शन करताना निश्चित झाला. १९८३च्या सुमारास शहा यांनी ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र त्याला फार व्यावसायिक यश मिळाले नसले तरी त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनास राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला होता. ‘कभी हां कभी ना’ किंवा ‘क्या कहना’ या शहा यांच्या दिग्दर्शित चित्रपटांनी रौप्य महोत्सवी टप्पा पार केला. खरे तर ‘जाने भी दो यारो’ किंवा ‘कभी हां कभी ना’ या दोन चित्रपटांत एका दशकाचे अंतर होते. तरीही दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन सरस असेच राहिले. चित्रपटांमधील ताजा टवटवीतपणा आणि प्रसन्न खेळकरपणा प्रत्येक वेळी तसाच राहिला नाही. शहा हे लेखक आणि दिग्दर्शक होते. दोन्ही आघाडय़ांवर त्यांनी समर्थपणे कार्य केले किंवा वास्तविकता, धीटपणाच्या नावाखाली सवंगपणा आपल्या दिग्दर्शन आणि लेखनात जाणवू दिला नाही. आपल्या सोबतची पिढी किती गर्भश्रीमंत झाली याचाही फार त्यांनी विचार केला नाही. कारण आपण भले आणि आपले काम भले हीच त्यांची भूमिका शेवटपर्यंत कायम होती. छोटा पडदा असो की मोठा पडदा असो, त्यांनी वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शनासाठी हाताळले आणि म्हणूनच ते कसदारपणा देऊ शकले. दादासाहेब फाळके हा सर्वोच्च सन्मान असो किंवा पद्म पुरस्कार असो, तोही मिळण्याचे भाग्य त्यांच्या वाटय़ाला कधी आले नाही आणि फार मोठ्या सन्मानाची शहा यांनीही कधी अपेक्षा ठेवली नाही. निखळ हास्यविनोदाचा आनंद देणारा हा यात्रिक होता.