आता येणार लिटील सिंघम

सामना ऑनलाईन । मुंबई

अजय देवगणच्या सिंघम चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहिट झाले. मोठ्यांपासून बच्चेकंपनीपर्यंत सर्वांनाच निडर सिंघमची स्टाईल आवडली होती. लहान मुलांमध्ये तर सिंघमची क्रेझ निर्माण झाली होती. हीच गोष्ट हेरुन सिंघमचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी याने बच्चे कंपनीसाठी सिंघमची अॅनिमेशन सिरिज आणली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून लिटील सिंघम ही अॅनिमेटेड सिरीज डिस्कव्हरी किड्स या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

पोलीस की वर्दी, शेर का दम, नाम है मेरा, लिटील सिंघम… अशी टॅगलाईन असलेली ही लिटील सिंघम सिरिज इंग्रजी, हिंदी, तामीळ, तेलगू या चार भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. या सिरीजच्या पहिल्या सिझनमध्ये १५६ एपिसोड असून त्यानंतर काहि महिन्यांचा ब्रेक घेऊन दुसरा सिझन सुरू करण्यात येईल. ” सिंघम हा चित्रपट मुलांमध्ये प्रचंड गाजला होता. त्यामुळे आता घरबसल्या मुलांना सिंघम चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून मी चित्रपटाची अॅनिमेटेड सिरीज तयार केली आहे. लिटील सिंघम हा मुलांसाठी त्यांच्यासारखाच दिसणारा एक सुपरहिरो असणार आहे.”, असे रोहित शेट्टीने प्रसारमाध्यमांना सांगितले. रोहीत शेट्टीने या अॅनिमेशन सिरीजचे प्रमोशन सुरू केले असून चित्रपटाप्रमाणेच ही सिरीज प्रमोट करण्यात येणार आहे.

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या सिंघम आणि सिघम रिटर्न्स हे दोन्ही भाग प्रचंड गाजले होते. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती रोहीत शेट्टीनेच केली होती. या दोन्ही चित्रपटात अजय देवगण एक कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भूमिकेत होता.