एसटी बँकेच्या संचालकांनी सदावर्ते यांच्याविरोधात थोपटले दंड

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेवर ऍड. गुणरत्न सदावर्तेंच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून आल्यापासून त्यांचा बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे बँकेचा आर्थिक डोलारा डळमळीत होत असल्याचा आरोप करत 19 पैकी 14 संचालकांनी एकत्र येत सदावर्ते यांच्या हस्तक्षेपाशिवाय बँकेचा कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याआधी सदावर्ते यांच्या प्रभावाखाली केलेले ठराव रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

एसटी बँकेवर सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल निवडून आल्यानंतर नियम धाब्यावर बसवून व्यवस्थापकीय संचालकांची आणि अन्य कर्मचाऱयांची नियुक्ती केल्याने संचालकांमध्ये आणि सभासदांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर बँकेच्या ठेवीही कमी होत असून त्याला सदावर्ते यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोप करत संचालकांनी बँक वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचा दावा आज संचालकांच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच आम्ही 14 संचालक एसटी कष्टकरी जनसंघाच्या झेंडय़ाखाली सदावर्तेंशिवाय बँकेचा कारभार चालवणार असल्याचा दावा केला आहे.