पार्किंग धोरणावरून भाजपमधील वाद चव्हाट्यावर

नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांचा पाठिंबा

आमदार राज पुरोहित यांचा विरोध कायम

१ एप्रिलपासून ‘ए’ वॉर्डात पार्किंग धोरण लागू

प्रतिनिधी । मुंबई

‘पे ऍण्ड पार्प’ धोरणावरची स्थगिती राज्य सरकारने उठवल्यानंतर धोरणाची अंमलबजावणी सुरू होताच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या धोरणाला स्थानिक नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांनी पाठिंबा दिलेला असताना स्थानिक आमदार राज पुरोहित यांनी मात्र या धोरणाला विरोध केला आहे. पार्किंग धोरण, हॉकर्स धोरण नेहमी कुलाब्यातच का? ‘बोरिवली’ किंवा ‘मुलुंड’मध्ये का नाही, असा सवाल करून त्यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांनाच टोला लगावला आहे.

मुंबई महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या पार्ंकग धोरणाला भाजपचे आमदार राज पुरोहित यांनीच विरोध केला होता. त्यानंतर राज्य सरकारने या धोरणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे महापालिकेचा कोटय़वधीचा महसूल बुडाला होता. दोन वर्षांनी राज्य सरकारने ही स्थगिती उठवली असून १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी ‘ए’ वॉर्डपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पुरोहित यांनी ‘ए’ वॉर्डातील रहिवाशांची बैठक घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली होती. पुरोहित यांनी आज रहिवाशांसह पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. आपल्यासोबत कुलाब्यातील २८ संघटना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पार्किंगचे दर परवडणारे असावेत, वेळेची अट काढून टाकावी तसेच स्थानिक वाहतूक व्यवस्थापन धोरण तयार करून त्यात संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश असावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. तसेच त्यांनी या धोरणाला पुन्हा स्थगिती आणण्याचेही प्रयत्न सुरू केले आहेत.

दोघांना एकत्र बोलावून बैठक

‘ए’ वॉर्ड कार्यालयात ऍड. नार्वेकर आणि पुरोहित या दोघांना एकत्र बोलावून बैठकही घेण्यात आली होती. कुलाबा रेसिडेण्ट असोसिएशन, माय ड्रीम कुलाबा, कुलाबा ऍडव्हान्स लोकॅलिटी अशा काही संघटनांचे नेतृत्व ऍड. नार्वेकर करीत असून त्यांनी या धोरणाचे स्वागत केले आहे. रहिवासी पार्किंग तळ योजनेलाही या संघटनांनी पाठिंबा दिला असून पालिकेकडे तसे अर्जही केले आहेत. व्यावसायिक वाहनांमुळे कुलाब्यात अनधिकृत पार्किंग वाढले आहे. या पॉलिसीची कुलाब्याला गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.