उमेदवारांना चिन्हांचे वाटप


सामना ऑनलाईन । धुळे

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून माघारीच्या मुदतीत चारजणांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात 28 उमेदवार राहिले आहेत. या मतदारसंघात 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत चारजणांचे अर्ज बाद झाले तर माघारीच्या काळात चौघांनी माघार घेतली. दरम्यान माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे यांना अपेक्षित असलेले शिट्ठी ऐवजी सफरचंद चिन्ह देण्यात आले. त्यावर गोटे यांनी तीव्र आक्षेप घेतला. पण तुमची उमेदवारी अपक्ष असून मार्गदर्शक तत्त्वानुसारच तुम्हाला चिन्ह देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. चिन्हवाटपानंतर आता प्रचाराचा रंग गडद होईल.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. निर्धारित कालावधीत 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननीत चौघांचे अर्ज बाद झाले. भाजप-शिवसेना-रिपाइं युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणारे त्यांचे पुत्र राहुल भामरे यांनी गुरुवारीच उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी अब्दुल रशीद शेख, ताहीर बेग मिर्झा, गाझी खान या तीनजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवारी मागे घेणाऱयांची संख्या चार झाली असून निवडणूक रिंगणात असणाऱयांची संख्या 28 झाली आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील, या उमेदवारांचा समावेश आहे. विकासकामे मार्गी लावल्याने प्रतिसाद वाढला