आधी पंजाब आणि आता रत्नागिरीत मतदान, प्रशासकीय अधिकाऱ्याचा मतदारांसमोर आदर्श

3

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

यापूर्वीचं मतदान पंजाब मध्ये आत्ताचं मतदान थेट रत्नागिरीत नोकरीच्या ठिकाणी करत रत्नागिरी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरीतील मतदारांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन गेले महिन्याभर आंचल गोयल करत होत्या. आपण इतरांना मतदानाचे आवाहन करतो मग आपण मतदान करायचे नाही हे त्यांच्या मनाला पटलं नव्हतं त्यामुळे त्यांनी आपले नाव रत्नागिरीच्या मतदान केंद्रावर नोंदवले होते.

दामले विद्यालय येथील मतदान केंद्रावर आज सकाळी दहा वाजता रत्नागिरी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी असताना त्यांनी मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले होते. मतदान केंद्रावरून मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सेल्फी पॉंईटवर जाऊन एक छायाचित्र काढले. त्यावेळी दैनिक सामनाशी बोलताना आंचल गोयल म्हणाल्या की, माझं मतदान पंजाब मध्ये होतं. लग्न झाल्यानंतर माझं नाव पंजाब मधील मतदार यादीतून रद्द झालं. या निवडणुकीत आम्ही नागरिकांना आवाहन करतोय अशावेळी आम्ही मतदान न करणे पटत नव्हतं म्हणून रत्नागिरीतील मतदान केंद्रात नाव नोंदवलं, अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली आहे.