दिवेआगरला ‘सुवर्ण गणेश’ पुन्हा विराजमान, नऊ वर्षांनंतर अंगारकीच्या मुहूर्तावर प्रतिष्ठापना

दिवेआगरसाठी आजचा दिवस पुन्हा एकदा ‘मंगलमय’ ठरला. नऊ वर्षांपूर्वी चोरीला गेलेला सुवर्ण गणेश  मोठय़ा दिमाखात आणि थाटामाटात विराजमान झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक विधिवत पूजन करून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी दिवेआगरवासीयांनी आपल्या कुटुंबासह मंदिरात हजेरी लावली. गणपती बाप्पा मोरया।।… मंगलमूर्ती मोरया।।.. अशा जयघोषाने सुवर्ण गणेश मंदिराचा परिसर भक्तिसागरात न्हाऊन निघाला.

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरावर 24 मार्च 2012 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. यात सुरक्षारक्षकासह दोघांना ठार मारून दरोडेखोरांनी गणपतीचा सोन्याचा मुखवटा चोरून नेला होता. मात्र पोलीस पथकांनी या चोरीचा छडा लावत दरोडेखोरांनी वितळवलेले मुखवटयाचे सोने हस्तगत करून सरकारने सुवर्णकार पु.ना. गाडगीळ यांच्याकडून नवीन मुखवटा तयार करून घेतला. आज सुवर्णगणेश विराजमान होणार म्हणून गावात घरांवर तोरणे आणि दारासमोर रांगोळ्या घालण्यात आल्या. सकाळी 8 वाजता मंदिर समितीचे अध्यक्ष महेश पिळणकर, विश्वस्त व ग्रामस्थांनी वाजतगाजत बाप्पाचा हा मुखवटा मंदिरात आणला. त्यानंतर पूजा करून दुपारी 12 वाजता या सुवर्णगणेशाची उपमुख्यमंत्री अजित पवार व पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, अनिकेत तटकरे उपस्थित होते.

सुरक्षेसाठी गोदरेजची तिजोरी, 16 सीसीटीव्ही पॅमेरे

2012 च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता दिवेआगर गणेश मंदिराभोवती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बाप्पाचा हा मुखवटा गोदरेजच्या एका मजबूत तिजोरीत ठेवण्यात येणार असून या तिजोरीला असलेल्या काचेतून भक्तांना दर्शन घेता येणार आहे. मात्र रात्रीच्या वेळी तिजोरीचा दरवाजा कुलूपबंद केला जाणार आहे. विशेष म्हणजे या तिजोरीला सेन्सर लावले असून कोणाचाही स्पर्श झाल्यास एक किलोमीटर परिसरात अलार्म वाजणार आहे. तसेच विश्वस्त, सरपंच, पोलिसांनाही तत्काळ मेसेज पोहोचणार आहे. मंदिरात 16 सीसीटीव्ही पॅमेरेही बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पोलीस चौकीदेखील उभारण्यात आली असून तेथे 24 तास दोन सशस्त्र्ा पोलीस तैनात असणार आहेत.  यावेळी दरोडय़ाचा छडा लावणारे पोलीस, वकील, धर्मादाय आयुक्त यांचा अजित पवार यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला.