जिवंत पत्नीचे श्राद्ध करण्यासाठी वाराणसीत येतात घटस्फोटीत पती!


सामना ऑनलाईन । वाराणसी

वाराणसी हिंदूधर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्राद्ध आणि पिंडदान केल्याने मृतात्मास मोक्ष मिळतो अशी धारणा आहे. मात्र, हयात असलेल्या पत्नीचे श्राद्ध करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पुरुषांची संख्या वाढल्याचे वाराणसीतील पुरोहितांनी सांगितले. आपली पत्नी अत्याचार करत असून तिच्यापासून घटस्फोट घेऊन त्या वाईट आठवणींपासून सुटका व्हावी, यासाठी अनेक पुरुष हा विधी करत असल्याचे सांगण्यात आले. वाराणसीत नुकत्यात 160 पुरुषांनी आपल्या जिवंत पत्नीचे श्राद्ध घालून वाईट आठवणींपासून सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

पत्नीच्या अत्याचारांपासून पीडित असलेले हे पुरुष ‘सेव्ह इंडिया फॅमेली’ या स्वंयसेवी संस्थेशी संबंधित आहेत. त्यांनी गंगा घाटावर पत्नीच्या नावाने श्राद्ध घातले आणि पिंडदान केले. तसेच पिशाचिनी मुक्ती पूजाही करण्यात आली. पत्नीच्या अत्याचारामुळे लग्न अयशस्वी झालेले पुरुष ही पूजा करतात असे संस्थेचे अध्यक्ष अमित देशपांडे यांनी सांगितले. लग्नानंतरचे पत्नीचे अत्याचार आणि वाईट आठवणींपासून सुटका व्हावी आणि पुढील आयुष्य सुरळीतपणे जगता यावे यासाठी हा विधी करण्यात येतो. मृत लोकांचे श्राद्ध घालून त्यांचा मोक्षासाठी पिंडदान करण्याची रुढी आहे. मात्र, जिंवत पत्नीचे श्राद्ध घालण्याची रित वाढत असल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले.

भाजपचे खासदार हरिनारायण राजभर यांनी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापन करण्याची मागणी नुकतीच केली आहे. संस्थेने राजभर यांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. आपली पितृसत्ताक कुटुंब पद्धती असून पुरुषांच्या अधिकाराच्या आणि हक्क्यांच्या रक्षणासाठी कोणताही कायदा नसल्याकडे संस्थेचे संस्थापक राजेश वखारिया यांनी लक्ष वेधले. तसेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशभरात सात मिनिटाला एक पुरुष पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हुंडाबळी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा अनेक महिला दुरुपयोग करत असून त्याचा गैरवापर करत पतीला छळ असल्याचा आरोप होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याच्या दुरुपयोगाकडे लक्ष वेधत अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. पतीविरोधात दाखल होणाऱ्या अशा अनेक प्रकरणात तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून पुरुष आयोगाबाबत गांर्भीयाने विचार करण्याची विनंती केली आहे. वाराणीसत पत्नीचे श्राद्ध घालण्यासाठी आलेल्या पुरुषांना महिलांनी अशाच खोट्या प्रकरणांमध्ये अडवल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. पोलीस आणि कायदा महिलांची बाजू घेत असल्याचे पुरषांची कुचंबणा होते. त्यामुळे पुरुषांच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आयोगाची गरज व्यक्त करणायात आली.

कायदा आणि पोलीस महिलांची बाजू घेत असल्याचे या समस्येपासून मुक्तीसाठी अनेकांना मोक्ष देणाऱ्या वाराणसीला आम्ही आलो आहोत. श्राद्ध, पिंडदान आणि पिशाचिनी मुक्ती विधी करून मानसिक शांती मिळाल्याचे येथे आलेल्या पुरुषांनी सांगितले.