ठसा : ‘पँथर’ बाबूराव शेजवळ

>>दिवाकर शेजवळ<<

ज्येष्ठ पँथर-रिपब्लिकन नेते बाबूराव शेजवळ हे रविवारी (19 ऑगस्ट) काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करणारे बाबूराव हे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत सक्रिय होते. शनिवारी कुलाबा येथील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाशी संबंधित कामे आटोपून ते रात्री उशिरा कामोठे येथील निवासस्थानी परतले होते. अखेरचा श्वास घेण्याआधी ते कुलाब्यातील झोपडपट्टीत होते आणि पँथरमधील त्यांच्या प्रारंभीच्या काळातही ते कुलाब्यातील दलित वस्त्यांमध्ये हमखास दिसायचे. हा योगायोग त्यांच्या आयुष्यात सीएसटी रेल्वे स्थानकासमोरील ‘टाइम्स’मधील नोकरीमुळे आला असावा. कारण त्यांच्या ऑफिसपासून कुलाबा भागातील पँथरच्या छावण्या नजीक असल्यामुळे त्यांचा तिथे विशेष संपर्क राहिला. बाबूराव हे ‘टाइम्स’मध्ये कर्मचारी असतानाच्या काळात उपाशीतापाशी चळवळीत फिरणाऱ्या पँथर कार्यकर्त्यांना ते ‘टाइम्स’च्या कॅण्टीनमध्ये जेवू घालायचे. त्या काळात तिथे त्यांच्यामुळे केवळ पाच रुपयांत थाळीभर जेवण मिळायचे, पण ती नोकरी नामांतर आंदोलनात स्वतःला झोकून दिल्याने त्यांना मध्येच गमवावी लागली होती. नंतरच्या काळात उदरनिर्वाहाची साधने नष्ट झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या हालअपेष्टा मग बाबूराव यांनाही चुकल्या नाहीत. त्या दुष्टचक्रात चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग येथून विस्थापित होऊन ते कामोठय़ापर्यंत फेकले गेले. खरे तर चेंबूरमध्ये ते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे सख्खे शेजारी आणि पँथरमधील ज्येष्ठ सहकारीही होते. दलित पँथर बरखास्त करण्यात आल्यानंतर आणि प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाडे, रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर नावारूपास येण्याआधी मुंबईत तरी भाई संगारे-अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वाखालील पँथरचा गट मजबूत आणि आक्रमक होता, तर कम्युनिस्ट ठरवण्यात आल्याने नामदेव ढसाळ यांचा पँथर गट अडचणीत आला होता, पण संगारे – महातेकर यांच्या गटात मात्र विठ्ठलराव साठे, मनोहर अंकुश, तानसेन ननावरे, रमाकांत गवळी, मुरली चंदन, संग्राम पगारे, जगदीश रामटेके असे अनेक मोहरे होते. बाबूराव शेजवळ हे त्या गटातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गणले जायचे. पुढे 1978 मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न पेटला. या प्रश्नाने भारतीय दलित पँथरला बळ मिळाले आणि संगारे-महातेकर यांच्या पँथर गटाला गळती लागली. पुढे नामांतर आंदोलनात एक मारक टप्पा आला. मराठवाडा विद्यापीठ नामांतराऐवजी पर्यायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ स्वीकारावे या मतप्रवाहाला पुढे आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला.  त्याचवेळी ‘साधना’ साप्ताहिकाचे त्यावेळचे संपादक यदुनाथ थत्ते यांनीही कोकण विद्यापीठाच्या पर्यायाचा स्वीकार दलितांनी करावा, अशी अवसानघातकी भूमिका घेतली होती. दुसरीकडे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात अनेक समाजवादी नेते नामांतर आंदोलनात असतानाच या प्रश्नी आंदोलनाऐवजी कागदी ठराव संमत करणाऱ्या परिषदांवर समाजवादी नेते मंडळी भर देऊ लागली. भारतीय दलित पँथरचे काही नेतेही अशा परिषदांकडे ओढले जात होते. या परिस्थितीत नामांतर आंदोलनाची तीव्रता संपण्याचा धोका निर्माण झाला होता. तसे घडू नये असे अनेक पँथर्सना वाटत होते. त्यांच्या भावनांना ‘वाट’ शोधून देण्याचे काम मोजक्या पँथर नेत्यांनी त्यावेळी केले. त्यांनी लॉंग मार्चनंतर उभा राहिलेला नामांतर आंदोलनातील प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा झंझावात मुंबईत आणला. त्यात बाबूराव शेजवळ यांचा पुढाकार आणि सहभाग होता. त्यानंतर कवाडे यांचा मुंबईतील पहिला मोर्चा 4 ऑगस्ट 1980 रोजी मंत्रालयावर धडकला होता. त्यासाठी स्थापन झालेल्या नामांतरवादी कृती समितीमध्ये आणि मोर्चात तानसेन ननावरे, डॉ. हरीश अहिरे, शाम गायकवाड, रमाकांत गवळी, बाबूराव शेजवळ, काकासाहेब खंबालकर, सुरेश सावंत, दिनेश भडानगे, चिंतामण गांगुर्डे आदी नेत्यांचा सहभाग होता. नंतर आपले आंदोलन नामांतरापुरते सीमित न ठेवता दलितांच्या सर्वच प्रश्नांवर लढण्यासाठी कवाडे यांनी 1981 मध्ये दलित मुक्ती सेना नागपुरात स्थापन केली. त्या संघटनेच्या प्रत्येक लढय़ात बाबूराव शेजवळ यांनी सपत्निक झोकून दिले होते. अनेकदा लाठीमार, तुरुंगवास सोसला, तर त्यांच्या पत्नी उषाताई शेजवळ यांनी महिला आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. त्यांच्या नेतृत्वात नामांतरासाठी ऐतिहासिक ‘बांगडी मोर्चा’ निघाला होता. पुढील काळात दलित मुक्ती सेना आणि भारतीय दलित पँथर या दोन संघटनांनी नामांतरासाठी भलेही समांतर, पण सातत्याने लढा दिला. त्यामुळे त्याला दिले गेलेले पर्याय मोडीत निघून नामांतर आंदोलनाची तीव्रता तब्बल 16 वर्षे कायम राहिली. त्याचे श्रेय प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले या दोघा नेत्यांना आणि त्यांना लढय़ात साथ दिलेल्या हजारो पँथर आणि भीमसैनिकांना जाते. बाबूराव शेजवळ हे त्यातलेच बिनीचे पॅन्थर आणि भीमसैनिक होते. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर अभिवादन सभा आणि जयंतीच्या पहाटे जल्लोषाची प्रथा सुरू करण्याचे श्रेय बाबूराव शेजवळ यांनाच जाते. तेथील अभिवादन सभेला रामविलास पासवान यांनीही 1980 च्या दशकात हजेरी लावली आहे. गेली काही वर्षे बाबूराव शेजवळ आणि त्यांच्या पत्नी उषाताई शेजवळ हे दोघेही रामदास आठवले यांच्या रिपाइंमध्ये कार्यरत होते. पण अत्याचारांची चीड आणि लढाऊ बाण्यामुळे बाबूराव हे उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्याही प्रेमात पडले होते. त्यांच्यातल्या पँथरने त्यांना वयाच्या 73व्या वर्षीही स्वस्थ बसू दिले नव्हते.