स्वागत दिवाळी अंकाचे – ११

उद्योजक

‘उद्योजक’ हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्थेचा ‘उद्योजक’ दिवाळी अंक असून या दिवाळी अंकाचे हे २८ वे वर्ष. संतुक गोलेगावकर यांनी तयार केलेले सुबक, आकर्षक असे मुखपृष्ठ असलेल्या या अंकात उद्यमींचे आगळेवेगळे उद्योग सांगितले जयवंत काकडे यांनी. उद्योजकीय प्रेरणांविषयी प्रा. दिनेश लोहार यांनी, महिलांच्या उंबरठय़ाबाहेरील कर्तृत्वाविषयी प्रा लीला पाटील, तंत्रज्ञानातून पैसा कमविण्याच्या मार्गाविषयी डॉ. दीपक शिंकारपूर यांनी लेख लिहिले आहे. एका शेतमजुराची प्रातिनिधिक व्यथा अय्युब पठाण यांनी मांडली आहे. महिलांच्या क्षमतेविषयी रसिका कुलकर्णी, दार ठोठावणाऱ्या संधीविषयी समर्थ पवार या मान्यवरांनी विचार व्यक्त केले आहेत.

मुख्य संपादक : बी. एस. जोशी

मूल्य : १५० रु., पृष्ठ : २२०

……………………………………………..

अर्थशक्ती

‘अर्थशक्ती’ हे बँकिंग, विमा व गुंतवणूक या विषयांना वाहिलेले मराठीतील वार्षिक आहे. तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकात अनेक मान्यवर लेखकांचे लेख आहेत. बँकिंग विभागात हिंदुस्थानी राष्ट्रीयीकृत बँकांची दयनीय स्थिती, बँकांतील कॉर्पोरेट गव्हर्नस, वस्तू व सेवाकर, डॉ. दीपक भुसारे, नागरी सहकारी बँका आणि गांधी कमिटी हे महत्त्वपूर्ण लेख या अंकात आहेत. याखेरीज बँकिंग डिजिटलायझेशन, बँकांचे कर्ज वितरण, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, स्टेस मॅनेजमेंट , बँकांचे लाभार्जन हे विषयही अंकात आहेत. शेअर्सची निवड व त्याची अचूक ऑर्डर, याविषयी दीपक म. नाडकर यांचे तीन लेख या अंकात आहेत.

संपादक : रमेश नार्वेकर

मूल्य : ७५ रु., पृष्ठ : ११२

………………………………………………

कान्हेरी

राजकारण, सामाजिक प्रश्नावरील भाष्य, क्रीडा जगत मान्यवर लेखकांच्या लेखणीतून सजले आहेत. नाना पालकर स्मृती समितीला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष लेखमाला प्रसिद्ध करण्यात आली आहे. लई भारी मुख्यमंत्री, हिंदुस्थान-चीन संबंधांचे भवितव्य, रजनीकांत, आभासाच्या गर्तेत भावी पिढी, कोकणचा शेतकरी, समर्पित जीवनाची कहाणी, म्हारी छोरियाँ, लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव, राशीभविष्य आदी मान्यवरांच्या साहित्याने हा अंक सजला आहे.

संपादक : रामकृष्ण यशवंत जोगळेकर

मूल्य : १०० रु., पृष्ठ : १३८

…………………………………………..

सुवर्णदीप

दिवाळीच्या उत्साही वातावरणात वाचकांना साहित्यिक फराळ आणि विरंगुळा देणारा हा अंक आहे. वाचकांना रुचेल अन् पचेल अशी रंजक, वैचारिक अन् ललित साहित्याची मेजवानी देणारे मान्यवरांचे लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. डॉ. विजया वाड, श्रीकांत आंब्रे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, विजयालक्ष्मी भोवड, विशाल रावराणे, विक्रांत महाशब्दे, स्नेहलता कुलथे, भीमराव पांचाळे आदी मान्यवरांचे विविध विषयांवरील लेख वाचनीय आहेत. याशिवाय आरती काटे यांचा रुचकर खानाखजाना, सुधा माने, रविराज भोवड यांची काव्य मैफल आणि  देवानंद भुवड यांची गझल दाद देण्याजोगे! सुनील आणि साहिल भोवड यांनी पानोपानी रेखाचित्रे, कार्टुन्स आणि पंचलाईन देऊन अंक सजविला आहे. जोडीला दवे महाराज यांचे वार्षिक राशीभविष्य आहे.

संपादिका आरती काटे

मूल्य ८०रु., पृष्ठ ः ९८

…………………………………………………

दर्याचा राजा

कथा, काव्यांगण, लेखमाला, बालसाहित्य, भक्तीपर, संगीत, नाटय़, सिनेमा, पर्यटन, आरोग्य, परीक्षण, विनोद आदी भरगच्च मजकूर असलेला यंदाचा हा अंक दरवर्षीप्रमाणेच दर्जेदार आहे. कथा विभागात मधु मंगेश कर्णिक, माधवी कुंटे, सदानंद संखे, श्रीधर दीक्षित, श्रीनिवास गुळवणी, हर्षवर्धन जोशी आदी मान्यवरांच्या वाचनीय कथा आहेत. डॉ. विजया वाड, अशोक लोटणकर, प्रा. प्रतिभा सराफ, सदानंद बामणे, डॉ. श्रीकांत नरुले आदींनी काव्य विभाग खुलवला आहे. श्रीकांत आंब्रे यांच्या खुमासदार वात्रटिका, तसेच संजय डहाळे, रत्नाकर पिळणकर यांचे पर्यटनविषयक बहारदार लेख मस्तच. जोडीला श्रीराम जोशी यांच वार्षिक राशीभविष्य आहे.

संपादक पंढरीनाथ तामोरे

मूल्य ७५ रु.,पृष्ठ ः १९२

………………………………………………..

साहित्य आभा

यंदाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष या विषयाशी संबंधित ‘निसर्गाशी दोस्ती करा!’- नीला उपाध्ये, दार्जिलिंग-सिक्कीम एक अलौकिक सौंदर्य-सुहास क्षीरसागर हे लेख उत्तम आहेत. याशिवाय संत वाङ्मय, समता आणि समरसता – प्रा. शाम अत्रे, व्हॉटस् ऍप – विचार की विकार – अश्विनी लेंभे, उपेक्षित संगीतकार ‘चित्रगुप्त’ – अभय गोखले, विरोधी पक्षाची पीछेहाट-आरती साठे हे लेखही उल्लेखनीय आहेत. संजय सहस्रबुद्धे, गिरीश खारकर, मुबारक शेख, निर्मला मठपती, उमा कोल्हे, श्रुती देसाई, विलास समेळ आदी नामवंतांच्या कविता या अंकात आहेत. विषयाला साजेसे मुखपृष्ठ लक्षवेधक.

संपादिका शारदा धुळप

मूल्य २०० रु., पृष्ठ ः १२८

………………………………………………

वैद्यराज

यंदाचा हा दिवाळी अंक मानसिक स्वास्थ्य या विषयाला वाहिलेला आहे. अवसाद अर्थात डिप्रेशनसारख्या मानसिक आजारावरील उपाय, उपचार या अंकात दिले आहेत. मन, एक अतर्क्यशक्ती (अजित नांदणीकर), स्वस्थ मनाचा मंत्र (स्नेहा मार्लेवार), ध्यान आणि मानसिक स्वास्थ्य (सुरेखा देवईकर), आहार आणि मनाचे स्वास्थ्य (अनंत धर्माधिकारी), निद्रानाशावरील आयुर्वेदीय समाधान (राजेंद्र जाधव), मानसोपचार आणि शिरोधारा (चंदा बिराजदार), निसर्गोपचार (प्रज्ञा कुलकर्णी), मानसिक स्वास्थ्य व योग (यशवंत पाटील), क्रोधावर नियंत्रणाचे उपाय (प्रशांत दळवी) आदी तज्ञ वैद्यांचे लेख माहितीपूर्ण आहेत.

संपादक वैद्य नंदकुमार मुळय़े

मूल्य १०० रु., पृष्ठ ः १४२

…………………………………………..

विवेक

वैचारिक लेखांची मेजवानी या अंकात आहे. सामाजिक प्रदूषणावर विवेकाची गरज सध्या आहे हे अधोरेखित करणारा दिलीप करंबेळकर यांचा लेख अंतर्मुख करणारा आहे. असहिष्णुता या वृत्तीची शास्त्र्ााrय मीमांसा करणारा बाळ फोंडके यांचा लेख उद्बोधक ठरेल. महात्मा फुले यांच्या विचारांवर थॉमस पेन या लेखकाच्या विचारसरणीचा कसा प्रभाव होता, हे श्याम अत्रे यांनी आपल्या लेखातून मांडले आहे. स्वातंत्र्यवीर सावकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडविले आहे डॉ. सुबोध नाईक यांनी. या लेखांसोबत कथा, व्यक्तिचित्रण, कविता, चित्रपट, निसर्ग आदी विषयांवरील लेखही वाचनीय. जोडीला वर्तमानावर खुमासदार भाष्य करणारी व्यंगचित्रंही आहेत.

कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर

मूल्य २०० रु., पृष्ठ ः ४५४