स्वागत दिवाळी अंकांचे – १०

2

साहित्य संगम

‘साहित्य संगम’ मासिकाचा यंदाचा अंक  अर्थकारणाबरोबरच समाजजीवनावरही भाष्य करणारा आहे. क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, अनिता दाते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक या अभिनेत्रींनी सासर-माहेरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘शाळा’ हा मनात जपलेला एक हळुवार कप्पा. या कप्प्यातील आठवणी स्वानंदी टिकेकर, तेजश्री प्रधान, वीणा जामकर, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या लेखाच्या माध्यमातून उलगडल्या आहेत.

संपादक : उमाकांत वाघ

मूल्य : १५० रु., पृष्ठ : १६८

…………………………………………..

साईनिर्णय

गोठ या मालिकेतील कलाकार रूपल नंद आणि समीर परांजपे यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर छापले आहे. पाणी साठवण्यासाठी धडपड करणारे राजेंद्र सिंह चौहान. त्यांचं या क्षेत्रातली मौल्यवान योगदानाची ओळख  ‘पाणीवाले बाबा’ या लेखातून वाचकांना होईल. याशिवाय पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र, जलम एव जीवन, पेटलेले पाणी, दा. कृ. सोमण यांचा पंचमहाशक्तीतील आप, पाण्यामृत, पाणी आणि मानवी मन असे काही पाण्याविषयीची उदात्तता, महानता दर्शवणारे लेखही अभ्यासनीय आहेत.

संपादक : महेश खर्द

मूल्य : ८० रु., पृष्ठ : १०८

…………………………………………….

आगरी दर्पण

माणसाची वैचारिक जडणघडण बालपणापासून सुरू होत वाढत्या वयापर्यंत प्रगल्भ होत जाते. याच पर्वाविषयी श्रीराम लागू, रेणू गावसकर, प्रभा गणोरकर, रोहिणी हट्टंगडी, शरद पोंक्षे आदी मान्यवरांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडले आहे. आगरी समाजातील पहिले आणि एकमेव आयपीएस अधिकारी डॉ. रवींद्र शिसवे यांची प्रेरणादायी प्रदीर्घ मुलाखत वाचनीय आहे.

हातून निसटलेल्या क्षणांविषयी अभिनेत्री अनिता दाते, हेमांगी कवी, सुरभी हांडे, कुशल बद्रिके, अभिजित खांडकेकर यांनी सांगितलेले अनुभव वाचता येतील.

संपादक : दीपक म्हात्रे

मूल्य : १५० रु., पृष्ठ : १९८

……………………………………………

जनश्रद्धा

या अंकात मधुमेह व जीवनशैली (डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी), सांधेदुखी व होमिओपॅथी (डॉ. राजेंद्र श्रीमाळी), पेशंट सॅटिसफॅक्शन – डॉ. निधी भन्साळी,  पंचकर्म एक वरदान – डॉ. विशाल वाघ हे आरोग्यविषयक लेख आहेत. बाबा आमटे, ग्रामीण आदिवासी महिलांचे जीवन, आरोग्यदायी फळे, जाहिरातीचे युग हे लेख वाचनीय आहेत. शिवाय मान्यवरांच्या कविता, व्यंगचित्रे, घरगुती उपाय, वार्षिक राशिभविष्य आदी मजकुराने अंक सजला आहे.

संपादक : सतीश शेकदार

मूल्य : १५० रु., पृष्ठ : १०४

……………………………………………

शूर सेनानी

यंदाचा हा अंक श्री शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ विशेषांक आहे. यात श्री स्वामी समर्थ कोकणात जैतापूर, राजापूरला आले होते. श्री स्वामीभक्त ब्रह्मानंद बुवा यांचे स्वामींचे कार्य, स्वामीशिष्य दत्तगिरी गोसावी यांचा इतिहास-चरित्र, श्री स्वामी समर्थ व शंकर महाराज यांचे गुरुशिष्य नाते उलगडणारा लेख, शंकर महाराजांचे कृपांकित आचार्य अत्रे, चित्रकार डी. डी. रेगे यांच्या संग्रही असणाऱया असंख्य साधूसंतांच्या दिव्य वस्तूंचा दर्शन सोहळा, त्यात स्वामींची गोंड्याची टोपी, शंकर महाराजांचा हंटर, रुद्राक्षमाळ, साईबाबांच्या पादुका अशा विविध लेखांचा समावेश आहे.

संपादक : संजय वेंगुर्लेकर

मूल्य : २०० रु., पृष्ठ : १६८

……………………………………………….

भक्तिसंगम

या भक्तीविषयक दिवाळी अंकात संतकवी दासगणूंचे भक्त, कबीराची कृपासमाधी,  माणगावचे दत्तमंदिर, कार्तिकस्नान, महारुद्र, तुकारामाची व्यथा, भीम-मारुती भेट, ज्ञानदेव म्हणे…, गिरिजात्मक लेण्याद्री, भगवान बुद्धांचे विचारधन व शिकवण, महावीरवाणी, श्री बसवेश्वरांचे विचारसंचित, देवाचे खरे रूप आदी लेख माहितीपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त अल्टरनेटिव्ह मेडिसिन, विवेकानंदांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष, गुरुदेव रानडे साक्षात्कार आणि विचार, सहज बोलणे-हीत उपदेश हे लेखही उल्लेखनीय आहेत. अध्यात्म्याची आवड असणाऱयांना हा अंक नक्कीच आवडेल.

संपादक : सुधाकर सामंत

मूल्य : ५० रु., पृष्ठ : ९०

…………………………………………………

संवाद दहावी आणि बारावी

संवाद प्रकाशन गेली २१ वर्षे दहावी-बारावी विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली देणारे अंक प्रकाशित करीत आहेत. दहावीसाठी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र तीन अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. या अंकाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे मार्च २०१७ मध्ये बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून विषयात प्रथम आलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पुनर्लिखित उत्तरपत्रिका त्यांच्याच हस्ताक्षरात जशाच्या तशा देण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका कुठे होतात? नेमके उत्तर कसे लिहावे, हुशार विद्यार्थी काय विचार करतात, उत्तरपत्रिका लिखाणाची शैली कशी असते तसेच महत्त्वाचे म्हणजे बोर्डाची पेपर तपासणी पद्धती कशी असते या साऱया महत्त्वपूर्ण गोष्टींचे आकलन होते. बारावीसाठी सायन्स व कॉमर्ससाठी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्लिखित उत्तरपत्रिका जशाच्या तशा या अंकात देण्यात आल्या आहेत.

संपादक : विजय कोतवाल

मूल्य : ३५० रु. प्रत्येकी

……………………………………………….

साभार पोच

मोहिनीराज

संपादक : सुभाष झेंडे

प्रेरणा विश्वात्मा

संपादिका : दीप्ती गावकर

मूल्य : ७५ रु., पृष्ठ : ७०