स्वागत दिवाळी अंकांचे – ७

2

आजचा तटरक्षक

या दिवाळी अंकात  नरेंद्र पाटील यांनी लिहिलेला ‘संघर्ष’ हा लेख, सदानंद संखे यांनी लिहिलेला ‘दैव जाणिले कुणी’, संजय पाटील यांनी लिहिलेला ‘तू फक्त हो म्हण’ हे लेख वाचनीय आणि माहितीपर आहेत, तर राजा मयेकर यांनी लिहिलेला ‘सेल्फीचे व्यसन आवरायला हवे’ हा लेख वास्तव दाखवणारा आहे. वीणा माच्छी यांचा सत्यघटनेवर आधारित असलेले ‘आक्रित टळलं’ हा लेख माहितीपूर्ण आहे. पद्मनाभ घुडे यांचा ‘ईश्वरी खरे ज्ञानसाधना मार्ग’, ‘अंधश्रद्धा एक अनुभव’, ‘तामसी मंगळ्या’ हे लेख वाचनीय आहेत. यतीन अक्रे यांनी ‘खेळ व नियम’ या लेखाची केलेली मांडणी उल्लेखनीय आहे.स्वादिष्ट पाककृतीमध्ये लीना दवणे यांच्या पाककृती भन्नाट मेजवानीचा आनंद देणाऱया आहेत.

संपादक : प्रवीण ना.दवणे

पृष्ठ : ११०, मूल्य : रु ८०

चित्रछाया

‘चित्रछाया’च्या दिवाळी अंकात प्रथेप्रमाणे ह. मो. मराठे यांची ‘दहाच्या आत घरात’ ही अखेरच्या काळातील कथा प्रसिद्ध करून ‘चित्रछाया’ने त्यांना आदरांजली वाहिली आहे. चंद्रकांत भोंजाळ यांची ‘भिंतीत चिणलेलं आयुष्य’ ही अनुवादित कथा, प्रवीण दवणे यांची ‘निरुत्तरांची प्रश्नचिन्हे’, विजया वाड यांची ‘आक्कू’ कादंबरी लेखन वाचकांना नक्की भावेल. ‘अतिशहाणा त्याचा…’ ही दिलीप चावरे यांची कथा वाचनीय आहे. शिक्षण क्षेत्रातील क्रतस्थ साधिका मीर कोर्डे यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे. सुरेश वांदिले यांची ‘शिळ्या कढीला’ वाचकांना आवडेल.

संपादक : अनिकेत जोशी

मूल्य : १००, पृष्ठ : १५६

कॉमेडी कट्टा

विविध प्रकारच्या विनोदी साहित्याने हा अंक सजला आहे. शंकर पुणतांबेकर यांची अनुवादित कथा, स्मिता पोतनीस यांची विनोदी विज्ञानकथा आणि हास्य आठवण विभागातील आचार्य अत्रेंची कथा धमाल आणतात. ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठेंची साहित्यिकांच्या संपाची गोष्ट सांगणारी व्यंगकथा सद्यस्थितीवर विनोदी चिमटे काढते. व्यंगचित्रं हा तर विनोदाचा अविभाज्य भाग. मधुकर धर्मापुरीकर आपल्याला अजित निनान या राजकीय व्यंगचित्रकाराच्या चित्रांतून सध्याच्या गाजलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटाची सैर घडवून आणतात. तर प्रकाश चव्हाण जिम अनगर या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराची ओळख करून देतात.

संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी,

मूल्य : १००, पृष्ठ : ११२

मुशाफिरी

निव्वळ प्रवासवर्णनांच्या पलीकडे जाऊन भटकंतीची नाना रूपं उलगडून दाखवणारा ‘मुशाफिरी’ हा ‘युनिक फीचर्स’चा एक लोकप्रिय दिवाळी अंक आहे. ‘गो-सोलो’ हा विभाग यंदाच्या अंकाचं वैशिष्टय़ आहे. यामध्ये यशोदा वाकणकर (लेह-लडाख), सायली महाराव (एव्हरेस्ट बेस कॅम्प) आणि अनंत झांजले (किब्बर) या तिघांनी हिमालयातल्या सोलो भटकंतीचे अनुभव सांगितले आहेत. शहराच्या अंतरंगात’ विभागात मधुरा दामले यांनी कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीटची, मधुकर गोखले यांनी नैरोबीची आणि डॉ. लिली जोशी यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को शहरांची सफर घडवली आहे. सहय़ाद्रीच्या आडवाटांवरची आश्चर्य, सांधण व्हॅली, जिथे सागर दुभंगतो असं कोरियातील एक ठिकाण आणि इस्रायलचा मृत समुद्र अशा अनोख्या ठिकाणांची माहिती या अंकात आहे. याशिवाय ‘ऑफबीट भटकंती’ विभागात हॉलंडमधील बॉश म्युझियम, थायलंडमधील हत्ती अभयारण्य, कोणार्कचे सूर्यमंदिरं आणि देशातल्या नद्यांचे संगम अशा अनेक हटके ठिकाणांची सफर घडते. जंगल मुशाफिरी विभागात अनुष्का रेगे यांनी तिलारीच्या जंगलातील भटकंतीचा अनुभव मांडला आहे तर श्री. द. महाजन यांची व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील भटकंतीचं रंगीबेरंगी चित्र रेखाटलं आहे.

संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी,

मूल्य : १२०, पृष्ठ : १३६

ललित

‘मराठी साहित्यात नागर जीवनाचे चित्रण ओसरले आहे काय?’ या परिसंवादात मधु मंगेश कर्णिक, नागनाथ कोतापल्ले, रंगनाथ पाठारे, गणेश मतकरी यांनी भूमिका मांडली आहे. ‘न्यूजस्टोरीचा सीक्वेल’ – ह. मो. मराठे, ‘जी. ए. कुलकर्णी : पुन्हा’ – वसंत आबाजी डहाके, ‘परीकथांच्या राज्यात – मीना वैशंपायन, ‘विद्याक्रती : दुर्गा भागवत’ – अंजली कीर्तने, जीवनशैली आणि ‘डिझाइन’ – दीपक घारे, ‘आठवणी लेखकांच्या’ – मिलिंद बोकील, ‘सरहदीपलीकडचा लेखक’ – नंदिनी आत्मसिद्ध, कालिदासाची चित्रात्मवृत्ती – पंकज भांबुरकर, हे लेख वाचनीय.

संपादक : अशोक कोठवळे

मूल्य : १५०/- पृष्ठ : २२०

रणांगण

कथा, मुलाखत, लेख, परिसंवाद, वैद्यक- विषयक लेख, कविता, गझल कट्टा आदी साहित्यातील विविध प्रकारचा फराळ घेऊन रणांगण हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. विजया कर्नाटकी, आदिनाथ हरवंदे, डॉ. अनिक प्रभाकुमार, चांगदेव काळे यांच्या कथा उत्तम तसेच अरुण म्हात्रे, श्याम हर्डीकर, प्रभाकर वाईरकर यांचे लेख वाचनीय. ‘हे पारतंत्र्य संपणार केव्हा?’ या परिसंवादात ऍड. मंदाकिनी पाटील, आश्लेषा महाजन, अनुपमा उजगरे, विद्याधर वालावलकर आदी नामवंतांनी विविध क्षेत्रांत झपाटय़ाने होणाऱया बदलांविषयी आपली मते मांडली आहेत. याव्यतिरिक्त डॉ. बाळ फोंडके, डॉ. श्रीधर नाईक, डॉ. मीनाक्षी कुऱहे, डॉ. ज्योत्स्ना पडळकर आदी नामवंतांचे वैद्यकविषयक माहितीपूर्ण लेख आहेत. रत्नमाला शिंदे, यामिनी दळवी, प्रसाद जोग, विजय उतेकर यांचा गझल कट्टा दाद देण्याजोगा!

संपादक : डॉ. अविनाश गारगोटे

मूल्य : १५०/- पृष्ठ : १९६.

चंमतग

गोलगोड गप्पा (राजीव तांबे), हॅलो मिस्टर बमचिक (रेणुका खोत), जोकर आणि दुतोंडी मासा (संस्कृती चोरगे), हॅपी बड्डे अब्बू (फारुक एस. काझी) या छान  गोष्टी, विनोद, कवितांची मैफल, फोटो कथा, खेळ आणि कलाशास्त्र्ा आदी  भरगच्च मजकूर असलेला दिवाळी अंक नजरेत भरणारा आहे. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फक्त छोटय़ा वाचकांसाठी असलेली मुलाखत हे या अंकाचे वैशिष्टय़. या लेखासोबत बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे मुलांसाठी बोनस आहेत. कातडं पांघरणारी अनोखी कला (डॉ. संतोष गायकवाड), हास्यचित्र (प्रशांत कुलकर्णी), मास्टर शेफ (यशोधन देशमुख) हे लेख छोटय़ांच्या कल्पकतेला खाद्य पुरविणारे आहेत. याशिवाय दिवाळी अंक कसा जन्म घेतो, त्यासाठी कोण काम करतं, संपादक, प्रकाशक म्हणजे काय, जाहिराती कशा मिळतात आदी माहिती सांगणारा लेख ज्ञानात भर टाकणारा.

संपादक : कीर्तिकुमार शिंदे

मूल्य : १२५/- पृष्ठ : १००.