दिवाळी पाडव्या निमित्त पं.आनंद भाटे यांच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध 

1

सामना प्रतिनिधी । परळी 

श्री. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गुरुवारी  सायंकाळी 7 ते 10 दरम्यान दिवाळी पाडव्यानिमित्त परळीत पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य तथा सुप्रसिद्ध गायक पं.आनंद भाटे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर हा कार्यक्रम संपन्न झाला.

गायन कार्यक्रमाच्या प्रारंभी पं.आनंद भाटे यांनी आदी महादेव या शास्त्रीय गायनाने  कार्यक्रमाची सुरुवात केली. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने परळीकरांना पं.आनंद भाटे यांचा भक्तीगीत, अभंगवाणीचा कार्यक्रम परळीकरांसाठी मेजवानीच ठरला. इंद्रायणी काठी लागली समाधी, ज्ञानियांचा राजा गुरू महाराज, जय शंकरा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल यासह अनेक भक्तीगीते शास्त्रीय गीतांने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

प्रभू वैद्यनाथाच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य मला लाभले असे यावेळी पं.आनंद भाटे म्हणाले. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, प्रा.बाबासाहेव देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिल तांदळे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या  कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे यांनीही उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचे पती डॉ.अमित पालवे सोबत होते.