मौजमज्जा!

1

मीना आंबेरकर

दिवाळीत फराळासोबत चटकदार पदार्थांचीही मजा घेऊया

आपल्या देशात दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा समजला जातो. दिवाळी कशी साजरी करायची. दिवाळीसाठी काय खरेदी करयची. गृहरचना कशी करायची. रांगोळी कोणती घालायची! दिवाळीसाठी कोणत्या खाद्यकृती करायच्या याचे प्लानिंग दसऱयापासून सुरू होते. गृहसजावटीपासून बाल्कनीत आकाशकंदील कोणता लावायचा. दिव्यांची रोषणाई कशी करायची यासारख्या अनेक बाबींवर चर्चा होऊन शेवटी एकदा सर्व निश्चित होते. काम वाटून दिली जातात. प्रत्येकजण उत्साहाने कामाला लागतात. गृहिणी दिवाळी फराळाच्या तयारीला लागतात. दरवर्षीचे पारंपरिक पदार्थ करायचेच असतात. दिवाळीचे ठराविक पदार्थ तर टाळता येण्यासारखेच नसतात, परंतु त्याहूनही काही दिवाळीसाठी वेगळय़ा खाद्यकृती करून त्यातही नाविन्य कसे आणता येतील. त्यातील गंमत कशी वाढवता येईल हे पाहणार आहोत.

laddu-5

खोबरा पनीर लाडू

साहित्य…2 वाटय़ा ओल्या नारळाचा किस, 1 वाटी साखर, पिवळा रंग, पाव वाटी पाणी, अर्धी वाटी मावा, अर्धी वाटी पनीर, 2 चमचे मिल्क मसाला, 2 चमचे दळलेली साखर 3-4 थेंब गुलाबाचा इसेन्स, वर्ख.

कृती…साखर, पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. साखर विरघळल्यानंतर त्यात खोबरे व मावा घाला. सतत ढवळत रहा. प्रथम मिश्रण थोडे पातळ होईल. नंतर ते सुकल्यानंतर रंग, इसेन्स घाला. कडेने सुटू लागल्यावर साधारण ओलसर गोळा तयार होईल तेव्हा गॅस बंद करून हलवत राहा. पनीर, साखर व मिल्क मसाला एकत्र करून त्याचे 8-10 गोळे बनवा. थोडे गरम असताना खोबऱयाचे मिश्रण हातात घेऊन मध्ये पनीरचा हलक्या हाताने त्याचे लाडू वळावे. पेपरकपमध्ये ठेवून वर्ख लावा लाडू दाबून तळू नका. तो हलका पोकळ पाहिजे. पनीर भरायचे नसल्यास खोबऱयाबरोबर पाकात टाका म्हणजे लाडू जास्त टिकतील.

spring-roll

नॉनव्हेज प्रिंग रोल्स

साहित्य…2 वाटय़ा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉअर, अर्धा चमचा मीठ, पाणी. (सारण) 2 पातीचे कांदे पातीसहित चिरून 2 गाजरे उभी बारीक चिरून, 2 भोपळी मिरच्या उभ्या चिरून, 1 वाटी वाफवलेले चिकनचे बारीक तुकडे, अर्धी वाटी छोटी कोलंबी वाफवून, 6-5 मश्रुम बारीक चिरून, 1 चमचा सोयासॉस, अर्धा चमचा चिली व्हिनेगर, 1 चमचा चिली सॉस, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, अर्धा चमचा अजिनोमोटो, थोडे तेल, 15-20 लसूण पाकळय़ा बारीक चिरून, मीठ चवीनुसार, तेल.

कृती…कव्हर- मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ एकत्र करून चांगले मळून त्याच्या लहान गोळय़ा करून चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्याव्यात. मंद गॅसवर त्या थोडय़ाशा भाजून घ्याव्यात.

सारण… कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यावर चिरलेली लसूण घालावी. लसूण किंचित गुलाबी रंगावर झाली की त्यावर कांदा घालावा. कांदा थोडा परतून झाल्यावर गाजर व भोपळी मिरचीचे तुकडे घालून चांगले परतावे. त्यावर चिकनचे तुकडे, कोलंबी, मश्रुमचे तुकडे घालून परतावे. नंतर सोया सॉस, चिली व्हिनेगर, चिली सॉस, काळीमिरी पावडर, अजिनोमोटो घालून परतावे. सर्व मिश्रण चांगले ढवळून घेऊन कोरडे करावे. चिरलेली पाती घालून मिश्रण ढवळून घ्यावे. नंतर एकेक पोळी घेऊन त्यावर केलेले मिश्रण घालून त्याचे रोल्स करावेत. मैद्याच्या पेस्टने रोलच्या कडा चिकटवून घ्याव्यात. सर्व रोल्स तयार करावेत. फ्रायपॅनमध्ये थोडे तेल घालून गुलाबी रंगावर रोल्स तळून घ्यावेत. बाहेर काढून त्याचे तुकडे करून शेजवान सॉसबरोबर गरमच सर्व्ह करावेत.

kilhapuri-misal1

कोल्हापुरी मिसळ

साहित्य…पाव किलो मटकी, 4 मोठे कांदे, 4 बटाटे, 4 टोमॅटो, 1 लिंबू, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, अर्धा नारळ, 2 चमचे कोल्हापुरी घाटी मसाला, मिसळीबरोबर देण्यासाठी छोटे पाव, पाव किलो फरसाण (शेव, चिवडा गाठी वगैरे) लाल तिखट 1 चमचा.

कृती…मोड आलेली मटकी शिजवून घ्यावी. मसाल्यासाठी सुके खोबरे, आले, लसूण, कांदा, धणे, जिरे, मिरे व लाल मिरच्या घ्याव्यात. तेलावर सर्व मसाला परतावा व वाटून घ्यावा. बटाटे उकडून सोलून फोडी कराव्यात. कांदे व टोमॅटो बारीक चिरावेत. चिरलेल्या कांद्यातील अर्धा कांदा बाजूला ठेवावा. तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी त्यावर उरलेला कांदा घालून जरा लालसर होईपर्यंत परतावा. त्यावर वाटलेला मसाला व त्यावर टोमॅटो घालून परतावे. नंतर त्यावर बटाटय़ाच्या फोडींपैकी अर्ध्या फोडी घालाव्यात. पाणी घालावे. शिजलेली मटकी, तिखट-मीठ घालावे. रस्सा उकळू द्यावा. नंतर त्यात लिंबू रस घालून उतरवावे. फरसाण, कच्चा कांदा, बटाटय़ाच्या फोडी, कोथिंबीर, ओले खोबरे तयार ठेवावे. या मिसळीबरोबर छोटे पाव देण्याची पद्धत आहे.

 

अंडे भरून करंदी पॅटीसpatice-22

साहित्य 4 अंडी घट्ट उकडलेली, 1 वाटी ताज्या ब्रेडचा चुरा, 1 टेस्पून मैद्याची पातळ पेस्ट, तेल तळण्यासाठी, पॅटीससाठी, 1/2 वाटी करंदी, 3 मध्यम बटाटे उकडून किसून, 5-6 मिरच्यांची पेस्ट, 2 टीस्पून आले, लसूण पेस्ट, 3 ब्रेडचा चुरा, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, मीठ चवीनुसार.

कृती उकडलेल्या अंडय़ाचे आडवे दोन भाग करावेत. कढईत 2 टेस्पून तेल घालून तापले की कांदा घालून परतावा. त्यावर करंदी घालून परतावे नंतर आले, लसूण पेस्ट, मिरची, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर घालून चांगले शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले कोरडे करून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात बटाटा व ब्रेडचा चुरा घालून चांगले मळून घ्यावे. मिश्रणाचा गोळा घेऊन त्याची 2 खोलगट वाटी करून त्यात कापलेले अंडे भरून पॅटीस बनवून घ्यावेत. तयार पॅटीस मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱयामध्ये घोळवून घ्यावेत. पॅटीसचा आकार हाताने व्यवस्थित करून घ्यावा. कढईत तेल गरम करून लाल रंगावर पॅटीस तळून घ्यावेत. सॉसबरोबर गरमच सर्व्ह करावेत.