एसटीची ऐन दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ, 21 ते 31 ऑक्टोबरदरम्यान तिकीटवाढ लागू

एसटी महामंडळाने 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ऐन दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ही भाडेवाढ 21 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

एसटी महामंडळाने दिवाळी सणासाठी हंगामी दहा टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. काल एसटी महामंडळाने 1500 जादा बस फेऱ्या सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता दिवाळी हंगामापुरती दहा टक्के भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसलाच लागू राहणार आहे. शिवनेरी व अश्वमेध या आरामदायी बस सेवेला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्याप्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

तथापी, ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक व  विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.