वाजवा रे वाजवा! बाप्पा पावला… लाऊडस्पीकर, डीजे, ढोल कडाडणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सायलेन्स झोनचा विनाकारण बाऊ करून राज्यात लाऊडस्पीकरच्या वापराला बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज एका आदेशानुसार स्थगिती दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी हे अंतरिम आदेश जारी केल्याने उद्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्पीकर आणि ‘डीजे’च्या दणदणाटाला उधाण येणार आहे. एकूणच या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तमाम गणेशभक्तांना उद्याच्या मिरवणुकीत वाजवा रे वाजवाचा जल्लोष करीत ढोल बडविण्यासाठी मोकळीकही मिळाली आहे.

ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन शांतता क्षेत्राबाबत केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवर सायलेन्स झोनचे सावट आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

याप्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने या प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांनाच नोटिसा बजावून यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेशच स्थगित केले.
लाऊडस्पीकरच्या बंदीची मागणी करणाऱया या सामाजिक कार्यकर्त्याने बंदीच्या बाजूने असलेले त्याचे म्हणणे येत्या दोन आठवडय़ांत न्यायालयात मांडावे.

मुंबई उच्च न्यायालयानेदेखील या प्रकरणात यापुढे कोणतेही आदेश देऊ नयेत, असेही खंडपीठाने बजावले आहे.

बंदी उठविल्याने असा काय मोठा फरक पडेल?

सामाजिक कार्यकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग हजर होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. सर्वोच्च न्यायालयानेदेखील यापूर्वी अशी स्थगिती दिलेली आहे याचीही त्यांनी खंडपीठाला आठवण करून दिली; परंतु त्याची खंडपीठाने दखल घेतली नाही. उलट ही बंदी उठविल्याने असा काय मोठा फरक पडेल, असा सवालही खंडपीठाने ऍड. सिंग यांना केला.