नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोटात रेल्वे मार्ग उडवला, 18 डबे घसरले

सामना ऑनलाईन । धनबाद

नक्षलवाद्यांनी धनबाद येथे सोमवारी मध्यरात्री राय आणि खेलारी दरम्यान असलेला रेल्वे मार्गच बॉम्ब स्फोटाने उडवल्याने दोन मालगाड्यांचे 18 डबे रुळावरून घसरले आहेत. यात एक मालगाडी उलटली आहे. यामुळे येथील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी 48 तास लागतील असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. यात मोटरमन जखमी झाला आहे.

रांचीजवळील खलारी राय रेल्वे स्टेशनजवळ या दोन मालगाड्यांना अपघात झाला आहे. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास डाऊन मार्गावरून एक मालगाडी कोळसा घेऊन जात होती. गाडीचे 25 डबे रुळावरून गेल्यानंतर अचानक स्फोट झाला, त्यात उर्वरित डबे रुळावरून घसरले. यातील एक डबा बाजूने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर पडल्याने कंटेनर वाहून नेणाऱ्या दुसऱ्या मालगाडीचे 15 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही मार्ग ठप्प झाल्याने रांचीला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोटरमनला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.