मोटारींची अनिर्वध संख्या

>>ज्ञानेश्वर गावडे<<

आपला देश परदेशी बनावटीच्या मोटारींची मोठी बाजारपेठ बनली आहे. ह्युंदाई, सुझुकी, टोयाटो, जनरल मोटार्ससारख्या कित्येक कंपन्या दरवर्षी अब्जावधी रुपये (नव्हे डॉलर्स) घेऊन जातात. देशात नवश्रीमंताची संख्या वाढत जाऊन त्यातून गाडीबाजांची संख्या वाढत आहे. एकटय़ा दिल्लीमध्ये वाहनसंख्या एक कोटीच्या आसपास गेली आहे, तर मुंबईसारख्या शहरात चार दिवस सुट्टीचे आले तर मुंबईला जोडणारे सर्व दिशांचे रस्ते मोटारींच्या संख्येने इतके फुगतात की, सुट्टय़ा घालवणारे रस्त्यावरच पस्तावतात. मोटार खरेदीत जसे देशाचे परकीय चलन खर्ची पडते तसेच त्या मोटारींना लागणारे महागडे परकीय चलन इंधनही खर्ची पडते. अशा दुहेरी प्रकारात देशाची व्यापारी तूट वाढत जाते. अशा वेळी क्युबा या देशाची आठवण येते. क्युबावर राजकीय दबाव यावेत म्हणून अमेरिकेने त्यांचे पेट्रोल बंद केले, परंतु त्यामुळे क्युबा नामोहरम झालेला नाही. त्यांनी चीनकडून लाखो सायकली, त्यांचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी राष्ट्राभिमानी असलेल्या त्यांच्या जनतेला मोटारींऐवजी सायकलीचा वापर करण्यास प्रवृत्त केले. त्यातून क्युबामधील नागरिकांचे आरोग्य सुधारले, प्रदूषण संपले, अमेरिकेकडून होणारी क्युबाची लूट थांबली त्यायोगे अमेरिकेपासून देश सुरक्षित राहिला. क्युबाचा हा स्वाभिमान आपल्याकडील आपमतलबी मंडळींनी स्वीकारला तर आपल्या देशाचे कितीतरी चांगले होईल. कोणत्याही देशात मोटारी वाढल्या की धूर व ध्वनिप्रदूषण वाढते. त्यामुळे लाखो लोकांना त्वचारोग, डोळय़ांच्या तक्रारी, क्षयरोग, दमा-अस्थमासारखे श्वसनरोग आदी विकार होऊ शकतात. देशाचे आरोग्य सुधारू शकते. स्वतःपुरते पाहणाऱ्यांना हा विचार पटणारा नाही.