जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी, जळगाव

पावसाळ्यात जिल्ह्यातील एकाही नदीनाल्याला पूर आला नाही. सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पिकांची वाढ खुंटली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. यामुळे जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. मागणीचे निवदेनही जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर करण्यात आले आहे.

माजी आमदार सुरेश जैन यांच्या निवासस्थानी शिवसेना आमदारांनी बोलवलेल्या बैठकीत आमदार किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार चिमणराव पाटील, आर. ओ. पाटील, कैलास पाटील तसेच महिला आघाडीच्या महानंदा पाटील, युवा सेनेचे प्रितेश ठाकूर उपस्थित होते.

गिरणा व अंजनी नदी कोरडीठाक आहे. यामुळे या नद्यांवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई तीक्र स्वरूपात जाणवत आहे. या समस्येकडे सरकारने आताच गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

९ महिने पाणीटंचाई
जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला, आतापासून जिल्हय़ात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकंदरीत जिल्ह्याची स्थिती भयावह आहे. सरकारने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून पाणीटंचाईची समस्या सोडवावी, असे आमदार पाटील यांनी सांगितले. जिह्यात नदीजोड प्रकल्पाची सुरुवात २००७ मध्ये झाली. मात्र, या विषयावर पुढे काही हालचाल झाली नाही. यामुळे शेतकऱयांना पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. याबाबत सरकारने अंमलबजावणी करून व नदीजोड प्रकल्प तातडीने राबवावा, यासाठी पाठपुरावा करू, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना सायंकाळी शिवसेनेच्या आजी – माजी आमदारांनी दिले. जिल्ह्याची स्थिती मी स्वतः बघत आहे. यामुळे शासनदरबारी आपली मागणी लवकर पोहचवितो, असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी निवेदन देणाऱ्या आमदारांना सांगितले.