हार्दिक पांड्याची तुलना कपिलशी नको!

 

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

हार्दिक पांड्याने सध्या लक्षवेधी अष्टपैलू कामगिरी केली आहे. हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिलदेव यांनीही हार्दिकच्या कामगिरीचे कौतुक केले, अनेकांनी त्याची तुलना थेट कपिलदेव यांच्या खेळाशी केली. मात्र ‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने पांड्याची इतक्यात कपिलदेवशी तुलना करणे घाईचे ठरेल, असे मत व्यक्त केलेय.

गांगुली म्हणाला, ‘हार्दिक पांड्या हा गुणी खेळाडू आहे. मात्र त्याची लगेच कपिलदेव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. कपिलदेव हे सर्वार्थाने महान खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या पुढची १०-१५ वर्षे याच पद्धतीने खेळत राहिल्यास आपण त्याची कपिलदेव यांच्याशी तुलना करू शकतो. सध्याच्या घडीला हार्दिकला त्याच्या खेळाची मजा घेऊ द्या. आगामी काळात हार्दिक पांड्याकडून अधिक आक्रमक खेळाची अपेक्षा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हार्दिकच्या खेळात सुधारणा होईल अशी मला आशा आहे,’ असेही गांगुलीने सांगितले.

‘टीम इंडिया’ शनिवारपासून ऑस्ट्रेलियाशी टी-२० मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत हार्दिक पांड्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर हिंदुस्थान घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याशी सामना करणार आहे. मात्र हिंदुस्थानी संघाचा सध्याचा फॉर्म पाहता टी-२० क्रिकेटमध्ये विराट सेनेच पारडे जड असेल.’ – सौरभ गांगुली