उत्तरपत्रिका तपासणी झाल्याशिवाय शिक्षकांना सेवेतून कमी करू नका!

प्राथनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

घड्य़ाळी तासांवर किंवा तात्पुरत्या स्वरूपात शाळेमध्ये नेमणुका झालेल्या शिक्षकांनादेखील दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी बंधनकारक आहे. अशा शिक्षकांची सेवा उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याच्या आधीच संपणार असेल तर अशा शिक्षकांना सेवेतून कमी करू नये. उत्तरपत्रिका तपासणीचे काम आधी पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना एसएससी बोर्डाने संबंधित शाळांना दिल्या आहेत.

मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाकडून शाळा आणि ज्युनियर कॉलेजना शिक्षकांची यादी पाठविण्यात आली असून ही यादी तपासून शाळांनी सेवानिवृत्त झालेले, सध्या हयात नसलेले तसेच सोडून गेलेल्या शिक्षकांची नावे यादीतून वगळावी तसेच घड्य़ाळी तासांवर किंवा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षकांची नावे यादीत दर्शविण्यात यावी, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सि. या. चांदेकर यांनी स्पष्ट केले.