तुम्ही दुपारी झोपता? मग हे वाचाच

सामना ऑनलाईन । मुंबई

दुपारची झोप सगळ्यांनाच प्रिय आहे. मात्र ही सवय शरीराला घातक ठरु शकते. दुपारी झोपण्यामुळे तुम्हाला अनेक व्याधी जडू शकतात.निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. याचसोबत शरीरात मेदाचाही संचय होतो. त्यामुळे या व्याधींपासून लांब राहायचं असेल तर दुपारची झोप टाळलेलीच बरी..

दुपारच्या झोपेमुळे शरिरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.
कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात.
केसात कोंडाही होऊ शकतो.
दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.