महायुतीची चिमठाणे येथे जाहीर सभा


सामना ऑनलाईन । धुळे

अक्कलपाडा धरणाच्या आधारे ज्यांनी चाळीस वर्षे स्वतःचे राजकारण केले. पंचवीस वर्षांत सुलवाडे-जामफळ प्रकल्पासाठी ज्यांनी पैसा आणला नाही. कृषीमंत्री राहूनदेखील शेतकऱयांचे प्रश्न सोडविले नाहीत तीच मंडळी आता जेव्हा माझ्यावर आरोप करतात तेव्हा त्यांची मला किंव वाटते. अनेक विकास कामे मार्गी लावली. विकास कामांना निधी आणला. त्यामुळेच आता मला गावागावातून नव्हे तर घराघरातून प्रतिसाद मिळत आहे, असा दावा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी केला. गुरुवारी डॉ. भामरे यांची चिमठाणे येथे जाहीर सभा झाली.उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि शिंदखेडय़ाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचारफेऱया काढल्या. गुरुवारी चिमठाण्यात सभा घेतली. या सभेला चिमठाण्याचे सरपंच खंडू भिल, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपच्या महिला आघाडीच्या संजीवनी सिसोदे, दरबारसिंग गिरासे, अनिल जैन, शिंदखेडा तालुकाध्यक्ष नथा वारुडे, नरेंद्र गिरासे, सुनील बेहरे आदी उपस्थित होते.

पाच वर्षांच्या कार्यकाळात शिंदखेडा तालुक्यासाठी महत्त्वाची असलेली सुलवाडे, जामफळ, कान्होली योजनेसाठी पंतप्रधानांच्या खास निधीतून पंचवीस हजार कोटी रुपये मिळविले. सहा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम मंजूर करवून आणले. रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यात आला. जनतेच्या पाठबळामुळेच ही सर्व विकास कामे करू शकलो. पण, माझ्या विरोधात असणारे अनेक वर्षे मंत्री होते. कृषीमंत्री असूनही त्यांनी शेती आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडविले नाहीत. अक्कलपाडा धरणाच्या नावाखाली चाळीस वर्षे राजकारण करीत सत्ता उपभोगली आणि जनतेची दिशाभूल केली, असे म्हणत डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील आणि त्यांचे वडील माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर हल्ला चढविला. पुन्हा एकदा मला भरघोस मतदान करून विजयी करा, असे आवाहन उमेदवार सुभाष भामरे यांनी केले.