झाला गँगरेप, मेडिकल रिपोर्टमध्ये डॉक्टर म्हणतात सहमती

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । भोपाळ

भोपाळ येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बलात्कारानंतर पीडितेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये चुकून सहमतीने शरीरसंबंध असं नमूद करण्यात आलं आहे. हा रिपोर्ट सुल्तानिया नावाच्या रुग्णालयात तयार केला गेला होता.

सुल्तानिया रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या पीडितेवर चार जणांनी तब्बल सहावेळा बलात्कार केला. मात्र, हा रिपोर्ट तयार करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांनी चुकून सहमतीने शरीरसंबंध असं लिहिलं. मात्र, आता ती चूक दुरुस्त करण्यात आली आहे.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचं ३१ ऑक्टोबर रोजी हबीबगंज रेल्वे स्टेशनजवळून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा गळा आवळण्यात आला होता. ती मेली असं समजून तिला तिथेच टाकून देण्यात आलं. पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यातही टाळाटाळ केली होती. अखेर ११ तासांनी तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.