रुग्णालय बनले भ्रूण कत्तलखाना,सांगोल्यातील डॉक्टर दांपत्याला अटक

सामना ऑनलाईन,पंढरपूर

सांगोला शहरातील कडलास रोड येथील न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम इथे गर्भपात करताना डॉ. सुहास जाधवर व डॉ.अश्‍विनी जाधवर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सोलापूरच्या भरारी पथकाच्या डॉ.अ‍ॅड.राजेश्‍वरी माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

भरारी पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये जाधवर दांपत्याच्या रूग्णालयात ७ ते ८ महिलांचा गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. या भरारी पथकामध्ये वैद्यकीय अधीक्षक संदीप बेलपत्रे हे देखील सहभागी होते. बेलपत्रे आणि डॉ.माने यांच्या पथकाने ऑपरेशन थिएटर, प्रसुती रूम सील केले आहे आणि रूग्णांच्या संदर्भातील हॉस्पीटलची कागदपत्रे ताब्यात घेतली.

दोन वर्षांपूर्वी या डॉ जाधवर कुटुंबाच्या या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले होते. हे प्रकरण
न्यायालयात सुरू असताना बोगस कागदपत्रे सादर करून या जाधवर दांपत्याने नवे हॉस्पिटल सुरू करून गर्भपात करण्याचा धंदा सुरू केला होता.  सांगोला पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे