संशोधक

नमिता वारणकर

हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱया बाजारातील महागडय़ा जाळीला पर्याय म्हणून मच्छरदाणीच्या कापडाचा वापर धुळे जिह्यातील दोंडाई गावातील डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांनी सुरू केला. या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे.

स्वित्झर्लंडमधील ‘प्रिंजर’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘मॅनेजमेंट ऑफ ऍबडॉमिनल हर्नियाज’ या पुस्तकात हर्नियावर मूलभूत संशोधन करणारे प्रख्यात डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर  यांच्या संशोधनाची दखल घेण्यात आली आहे. गेल्या 300 वर्षांत हर्नियावर जगभरातील ज्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले अशा 47 व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून ते हिंदुस्थानातील एकमेव डॉक्टर आहेत.

हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱया बाजारातील महागडय़ा जाळीला पर्याय म्हणून मच्छरदाणीच्या कापडाचा वापर धुळे जिह्यातील दोंडाई गावातील डॉ. टोणगावकर यांनी सुरू केला. आता जगभरातील 28 डॉक्टर या कापडाचा वापर करतात. त्यांच्या या संशोधनाविषयी ते सांगतात, हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी 2003 सालापासून नव्या मच्छरदाणीचा वापर सुरू केला. ही जाळी विदेशी जाळींपेक्षा चार हजार पटींनी स्वस्त आहे शिवाय या कापडाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हेही लक्षात  आले. तेव्हा तिचा वापर रुग्णांसाठी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता महागडय़ा विदेशी जाळीचा भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत नाही.

आज मागासलेल्या 28 देशांमध्ये मच्छरदाणीच्या कापडाचा वापर सुरू आहे. गेल्या 18 वर्षांत जगभरात साधारण 35 हजारांवर हर्नियाच्या  शस्त्रक्रिया या जाळीचा वापर करून केल्या गेल्या आहेत. जगभरातील डॉक्टरांना ते ही जाळी मोफत पाठवतात. त्यामुळे  दोंडाईसारख्या ग्रामीण भागातील शल्यचिकित्सकाचा समावेश होणं ही खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट असल्याचे त्यांना वाटते.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्जन प्रोफेसर डॉ. टेहेमटन उडवाडिया यांच्या सहकार्यामुळे हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी मच्छरदाणीचा वापर हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असे ते सांगतात. 2006 साली डॉ. उडवाडिया यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या 10 व्या जागतिक एन्डोस्कोपिक सर्जरीच्या परिषदेत ‘हर्नियाकरिता स्वस्त मच्छरदाणीचा वापर’ या विषयाकरिता त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या विषयावर 12 पेक्षा जास्त प्रबंध प्रसिद्ध झाले. तसेच 2000 साली झालेल्या एका परिषदेत आंध्र प्रदेशातील कुर्नुल येथील डॉ. ब्रह्मा रेड्डी या ग्रामीण भागातील सर्जनने ते हर्निया शस्त्रक्रियेत वापरत असलेल्या मच्छरदाणीच्या विषयाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी पुण्याच्या एका  मोठय़ा प्रयोगशाळेत त्या कापडाची सर्व प्रकारची तपासणी केली आणि त्याचा वापर स्वतः सुरू केला. 5 इतर सर्जनकडेही अभ्यासाकरिता ते कापड पाठविले. त्यानंतर 2009 साली इंग्लडमधील प्रख्यात सर्जन आणि ‘ऑपरेशन हर्निया’ आणि नंतर ‘इंटरनॅशनल हर्निया’ मिशन या सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष आणि युरोपियन हर्निया सोसायटीचे  अध्यक्ष प्रो. अण्ड्रय़ु किंग्जनॉर्थ यांनी त्यांना जर्मनीतील  4 थ्या ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ हर्निया सोसायटी’ येथे विश्व संमेलनात या विषयावर बोलण्याची संधी दिली. यामुळेच 2013 साली कतार देशातील दोहा शहरात भरलेल्या ‘विश’ (वर्ल्ड इनोव्हेशन समिट ऑन हेल्थ) या विश्व संमेलनात डॉ. टोणगावकर यांच्या संशोधनाला पहिले बक्षीस देण्यात आले.

फक्त 2 रुपये…

हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱया परदेशी जाळीची किंमत  दोन हजार रुपये होती. पोटाच्या मोठय़ा हर्नियासाठी बाजारातील जाळीची किंमत दहा हजार रुपये असते. तर डॉ. टोणगावकरांनी  संशोधित केलेल्या जाळीला फक्त दोन रुपये लागतात. त्यामुळे हिंदुस्थानसह विदेशातीलही अनेक डॉक्टरांनी जाळीचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. हे कापड बाजारात सहज उपलब्ध होते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

35 हजारांवर हर्निया शस्त्रक्रिया

‘ऑपरेशन हर्निया’ या सेवाभावी संस्थेमार्फत गरीबांसाठी युरोपियन आणि अमेरिकन सर्जन्सचे पथक पाठवून विनामूल्य हर्निया ऑपरेशन शिबिरे घेतली जातात. डॉ. टोणगावकर या संस्थेचे अध्यक्ष प्रो. किंग्जनॉर्थ यांना खूप मोठय़ा प्रमाणात मच्छरदाणीच्या कापडाचे तागे विनामूल्य पाठवतात. सध्या 28 देशांत अशी शिबिरे घेतली जात आहेत. त्यामुळे गेल्या 18 वर्षांत जगभरात साधारण 35 हजारांपेक्षा जास्त  हर्निया शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यामुळे कित्येक गरीब रुग्णांचा खर्च वाचला आहे. आजही अशा मोफत शस्त्रक्रिया ते करतात.