भाईजानशी टक्कर घेणार सिम्बा?


सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाचं वर्ष चित्रपटप्रेमींसाठी खूप चांगलं जाणार आहे. कारण, अनेक बड्या बॅनरचे चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. यंदाच्या डिसेंबर महिन्यात तर अनेक चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. सलमान खान अभिनित दबंग ३ आणि रणवीर सिंगचा सिम्बा हे दोन्ही चित्रपट क्लॅश होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात दबंग ३ च्या प्रदर्शनाची जी तारीख निश्चित करण्यात आली आहे, त्या तारखेला शाहरूख खानचा झीरो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जर सलमानने आपल्या चित्रपटाची तारीख आधीची ठेवली तर सिम्बा या चित्रपटासोबत त्याला आपला चित्रपट प्रदर्शित करावा लागेल. याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसू शकतो, कारण दबंग ३ आणि सिम्बा हे दोन्ही चित्रपट पोलिसांच्या आयुष्यावर बेतले आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनाचा ओव्हरडोस झाला तर दोन्ही चित्रपटांना याचा फटका बसेल.

सलमान यावर काय निर्णय घेतो, ते स्पष्ट झालेलं नाही. दबंग ३ चा निर्माता अरबाज खान एप्रिल महिन्यात यासंबंधीचे खुलासे करणार आहे. तर दुसरीकडे, दबंग ३पेक्षा आपला चित्रपट वेगळ्या जॉनरचा असल्याचं मत सिम्बाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचं म्हणणं आहे.