मार्निंग वॉकदरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला २२ जणांचा चावा

सामना ऑनलाईन । पालांदूर

भंडारा जिल्ह्यातील पालांदूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी सहाच्या दरम्यान परिसरातील काही महिला व पुरूष नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकसाठी गेले होते. त्यादरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यांनी तब्बल २२ जणांचा चावा घेतला. त्यातील १३ जणांवर भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात तर ९ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यात भंडारा नगरपरिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे त्यांनी पिसाळलेले कुत्रे पकडण्याची जबाबदारी पालांदूर ग्रामपंचायतीकडे सोपवली आहे. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यांना लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी पालांदूर परिसरातील नागरीक करत आहेत.