मालवण किनारी सापडला मृत डॉल्फिन

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण किनारपट्टी लगत डॉल्फिनचा वावर गेले काही दिवस वाढला असताना येथील दांडी समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी मृतावस्थेतील डॉल्फिन मच्छीमारांना आढळून आला. हा मासा सडलेल्या अवस्थेत असल्याने तीन-चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मृत डॉल्फिनबाबत मालवण पालिकेच्या आरोग्य विभागास माहिती देण्यात आल्यानंतर पालिकेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या डॉल्फिन माशाला आडारी येथील डंपिंग ग्राउंड मध्ये नेऊन जमिनीत पुरून त्याची विल्हेवाट लावली. मात्र या डॉल्फिनचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.