डोंबिवलीच्या इंदिरा चौकात रिक्षाचालकांची मुजोरी, १०च्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

2

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

डोंबिवली पूर्वेकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मोठा फटका दहावीच्या विद्याथ्र्यांना बसत आहे. येथील इंदिरा चौकाचा ताबा या रिक्षाचालकांनी घेतला असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम होत आहे. याकडे वाहतूक खात्याने सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे दहावीचे विद्यार्थी या ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्यूहात अडकत असून परीक्षेचे केंद्र गाठताना त्यांची प्रचंड ओढाताण होत आहे.

इंदिरा चौक हे डोंबिवलीतील वाहतुकीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र या चौकाचा ताबा मुजोर रिक्षाचालकांनी घेतला आहे. येथे तैनात असलेले वाहतूक पोलीस रिक्षाचालकांच्या या ‘हम करेसो’ वागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. या चौकात एकाच ठिकाणी चार ते पाच पोलीस उभे राहात असल्याने वाहतुकीच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडत आहे. वाहतूक पोलीस फक्त दुचाकीस्वारांना अडवत असून रिक्षाचालकांना मात्र रानमोकळे करून देत आहेत. याबाबत वाहतूक निरीक्षक गोविंद गंभीरे यांना विचारणा केली असता आमच्याकडे वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे, आम्ही काय करणार? अशी उत्तरे दिली जात आहेत.

निदान परीक्षा संपेपर्यंत तरी यातून सोडवा!
सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांची आधीच वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी ओढाताण होत असताना त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थी परिवहन बसने तर काही विद्यार्थी रिक्षाने प्रवास करून परीक्षा केंद्रांवर पोहोचतात. मात्र या चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. निदान परीक्षा संपेपर्यंत या चौकातील वाहतूककोंडी दूर करा, असे साकडे त्यांनी वाहतूक पोलिसांना घातले आहे.