डोंबिवलीकरांचा प्रदूषणाचा फास सुटणार

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची नवी ओळख गेल्या काही वर्षांत प्रदूषणाचे ‘हब’ झाली आहे. मात्र शहराच्या कपाळी लागलेले ‘बालंट’ लवकरच पुसले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. राज्य, केंद्र सरकारबरोबरच रकमेतील २५ टक्के वाटा येथील उद्योजक उचलणार आहेत. त्यामुळे लवकरच डोंबिवलीकरांच्या गळ्याभोवतीचा फास सुटणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही वर्षांपूर्वीच देशातील प्रदूषित शहरांची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये डोंबिवली देशात सातवी तर राज्यात दुसरी आली होती. शहरातील या महाभयंकर वाढत्या प्रदूषणामुळे एकच खळबळ उडाली होती. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर अनेक प्रदूषणकारी कंपन्यांना टाळे लावण्यात आले. कारवाईची कडक मोहीम सुरू झाल्यानंतर एरवी नियम पायदळी तुडवत रासायनिक पाणी थेट नदीत सोडणाऱ्या ४० ते ५० कंपन्यांनी स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले. एमआयडीसीनेही आता डोंबिवलीचे प्रदूषणच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी १०० कोटींची महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सिंगापूर येथील कंपनीला पाच वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. ही कंपनी शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करणार आहे. येत्या वर्षभरात ही योजना कार्यान्वित होईल, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजीव ननवरे यांनी दिले.

समुद्रात सात मीटर लांब पाइपलाइन टाकणार
पूर्वी अनेक कंपन्या खुलेआम रासायनिक पाणी प्रक्रिया न करताच नदी-नाल्यांमध्ये सोडत होते. मात्र आता प्रक्रिया केलेले सांडपाणी पाइपलाइनद्वारे समुद्रात साडेसात मीटर आतमध्ये सोडण्यात येणार आहे. दरम्यान, या १०० कोटींच्या योजनेसाठी एमआयडीसी, राज्य व केंद्र सरकार २५ टक्के रक्कम देणार असून उर्वरित २५ टक्के खर्च उद्योजक उचलणार आहेत.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाढत्या प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता. यामुळे आता प्रक्रिया केलेले रासायनिक पाणी बंद पाइपलाइनद्वारे ठाकुर्ली खाडीत सोडले जात असल्याची माहिती सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक मनोज जालान यांनी दिली. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष मुरली अय्यर, कार्यवाह देवेन सोनी, हेमंत भिडे उपस्थित होते.