दुसऱया ‘हिमालया’वर प्रवाशांची थरथर

सामना प्रतिनिधी। डोंबिवली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला लागून असलेला ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे स्थानकात रोज येणाऱया हजारो प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. डोंबिवली स्थानकाला जोडणारा कल्याण दिशेकडील 40 वर्षांपूर्वीचा पादचारी पूल धोकादायक बनला असून गर्दीच्या वेळी तो अक्षरश: हादरतो. त्यामुळे आता पुलावर पाय ठेवताच ‘हिमालय’ दुर्घटनेची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? या भीतीने चाकरमान्यांची थरथर वाढली आहे.

डोंबिवली स्थानकातून दररोज तीन लाख प्रवासी प्रवास करतात. या स्थानकात तीन पादचारी पूल आहेत. यापैकी कल्याण दिशेकडील पूल 40 वर्षे जुना असून त्याची अवस्था धोकादायक आहे. पुलाखालून लोकल गेली तरीही हा पूल हादरतो असा प्रवाशांना अनुभव आहे. या पुलाची डागडुजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मध्य रेल्वेने नेमलेल्या पाहणी समितीनेही हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तसेच हा पूल दोन महिन्यांत पाडण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र आजही पुलावरून प्रवाशांची ये-जा सुरूच आहे. आता तर मुंबईत घडलेल्या रेल्वे पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन डोंबिवलीतील धोकादायक पुलाबाबत गंभीर बनणार का, असा संतप्त सवाल रेल्वे प्रवासी करीत आहेत.

हे देवा, रक्षण कर!

वर्षभरापूर्वी या पादचारी पुलावर शिवसेनेने धोक्याचा फलक लावला आहे. या वेळपासून थोडय़ाच दिवसांत नवीन पूल बांधणार असे रेल्वे प्रशासन सांगत आहे. मात्र रेल्वेला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. थरथर हलणाऱया पुलावरून रोज जीव मुठीत घेऊन ये-जा करताना ‘हे देवा रक्षण कर’ म्हणण्याशिवाय प्रवाशांना गत्यंतर नाही.

दरम्यान ,नवीन पुलाबाबत संपूर्ण रूपरेषा तयार झाली असून जुना पूल बंद करण्यात येणार आहे. जुना पूल साडेचार मीटर रुंदीचा असून पूल अपुरा पडतो. याचा विचार करून पूल बांधण्यात येईल. असे मध्य रेल्वेचे डीआरएमसंजय जैन, यांनी सांगितले आहे. 

–