धनंजय कुलकर्णीला अखेर पोलीस कोठडी

83

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर विकेण्डला तुरुंगाबाहेर येण्याचे स्वप्न पाहणाऱया भाजपच्या धनंजय कुलकर्णीचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत. न्यायालयाने त्याचा जामीनअर्ज फेटाळत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. नॉव्हेल्टी दुकानात मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा करणाऱया धनंजय कुलकर्णीला अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला क्षणार्धात न्यायालयीन कोठडी देत जामिनाचा मार्ग मोकळा केला होता. या निर्णयाविरोधात क्राइम ब्रँच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असतानाच कल्याण न्यायालयाने कुलकर्णीला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे धनंजय कुलकर्णीची या चार दिवसांमध्ये कसून चौकशी होणार आहे.

भाजपचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या मानपाडा रोडवरील दुकानात कल्याण क्राइम ब्रँचने 16 जानेवारी रोजी दुकानाकर धाड टाकून 170 प्राणघातक हत्यारे हस्तगत केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र कल्याण क्राइम ब्रँचने न्यायालयात विनंतीअर्ज करून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच ठाणे सत्र न्यायालयात जाण्याचीही तयारी केली. दरम्यान याचवेळी कुलकर्णीनेही जामिनासाठी अर्ज केला. या पार्श्वभूमीवर आज कल्याण कोर्टात जामीनअर्जावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील वाय. एम. पाटील यांनी संवेदनशील प्रकरण असल्याने कुलकर्णीला जामीन न देता पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी 22 जानेवारीपर्यंत कुलकर्णीला पोलीस कोठडी सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या