विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासू व सासऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा

2
crime

सामना प्रतिनिधी । नगर

विवाहितेने माहेरून प्लॉट घेण्यासाठी 6 लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा छळ केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बांबर्डे यांनी आरोपी पती दिनेश कारभारी पालवे, सासू सुनिता कारभारी पालवे व सासरा कारभारी नाथा पालवे सर्व रा. कोल्हार ता. पाथर्डी यांना दोषी धरून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ड.व्हि.के.भोर्डे यांनी काम पाहिले.

पीडित जिजा दिनेश पालवे हिचा विवाह कोल्हार ता. पाथर्डी येथील दिनेश कारभारी पालवे याच्या बरोबर 18 मे 2016 रोजी झाला होता. पती दिनेश, सासू सुनिता व सासरा कारभारी यांनी लग्नामध्ये हुंडा कमी दिला म्हणून प्लॉट घेण्यासाठी आणखी 6 लाख रुपये माहेरून आणावे अशी मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जिजा पालवे हिने 21 मार्च 2017 रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी नगर येथे व त्यानंतर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना .26 मार्च 2017 रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत तिचे वडील लक्ष्मण न्यानदेव बडे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात वर्ग होऊन झाला. या गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.नि. पांडुरंग पवार यांनी केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बांबर्डे यांच्यासमोर झाली. या खटल्यात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाने दिलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने तिघा आरोपींना भादवि कलम 498 अ अन्वये दोषी धरले. आरोपी पती दिनेश पालवे याला 3 वर्ष तुरूंगवास व पाचशे रुपये दंड आरोपी सासू सुनिता पालवे व सासरा कारभारी पालवे यांना प्रत्येकी 1 वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी 200 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.