थीमकडून फेडररचे स्वप्न भंग, एटीपी इंडियन वेल्स टेनिस

5

सामना ऑनलाईन । इंडियन वेल्स

ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या किताबी लढतीत बलाढ्य रॉजर फेडररचे आव्हान मोडीत काढून विजेतेपदावर आपले नाव कोरले. थीमने कारकीर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. थीमचे हे बारावे विजेतेपद होय.

आठव्या मानांकित डोमिनिक थीमने चौथ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 3-6, 6-3, 7-5 असा पराभव करूत किताबाला गवसणी घातली. फेडरर या स्पर्धेत नवव्यांदा अंतिम फेरीत पोहचला होता, मात्र जेतेपदाचा षटकार ठोकण्याचे त्याचे स्वप्न थीमने भंगवले. फेडररने पाच वेळा या स्पर्धेचा करंडक जिंकलेला आहे.

फेडरर व थीम पाचव्यांदा आमनेसामने आले होते. यात थीमने तिसऱ्यांदा बाजी मारण्यात यश मिळविले. फेडररने दोन वेळा थीमला हरविलेले आहे. सोमवारच्या किताबी लढतीत फेडररने तीन तर थीमने एक ऐस लगावले. थीमने 3 तर फेडररने दोन दुहेरी चुका केल्या. याचबरोबर थीमने तीन वेळा ब्रेक पॉइंट मिळविले तर फेडररला दोन वेळाच हा पराक्रम करता आला.