अमेरिकेला सगळे लुटायला निघालेत; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हिंदुस्थानवर आरोप

72

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकन मोटरसायकलवर जादा आयात शुल्क आकारण्याच्या हिंदुस्थानच्या भूमिकेवर मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगपाखड केली. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भले आयात शुल्क 100 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणले असेल, मात्र तरीही ते स्वीकारार्ह नाही. अमेरिका ही बँक असून तिची लूट करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, असे स्पष्ट मत नोंदवतानाच ट्रम्प यांनी अमेरिका हा काही मूर्ख देश नाही, असेही बजावले.

हिंदुस्थानने अमेरिकेच्या हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवर ज्यादा आयात शुल्क आकारले आहे. यावर ट्रम्प यांनी मंगळवारी टीका केली. ते म्हणाले की, ‘अमेरिकेला आणखी मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. आमचा चांगला मित्र असलेल्या हिंदुस्थानकडे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपण काय केले हे तुम्हीच पाहा, मोटरसायकलवर 100 टक्के कर. आम्ही मात्र हिंदुस्थानच्या मोटरसायकलवर काहीच शुल्क आकारले नाही.’ ट्रम्प यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आयात शुल्काबाबतची ही नाराजी बोलून दाखवली. जादा आयात शुल्काबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी केली. त्यांनी हे शुल्क 100 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणले आहे, मात्र हेदेखील स्वीकारार्ह नाही. कारण हे ‘50 टक्के विरुद्ध शून्य’ असे समीकरण आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करत ट्रम्प यांनी या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांमध्ये अजूनही बोलणी सुरू असल्याचे नमूद केले.

हिंदुस्थान ‘करांचा राजा’

डोनाल्ड ट्रम्प यांनी कर आकारणीबाबत हिंदुस्थानवर यापूर्वीही टीका केली आहे. जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश आहे. अमेरिकेच्या उत्पादनांवर प्रचंड कर आकारणारा हिंदुस्थान हा ‘करांचा राजा’ आहे, असे प्रमाणपत्र ट्रम्प यांनी वारंवार दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या