राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी मारल्या २ हजार थापा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

२० जानेवारी २०१७ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प मीडियाला लक्ष्य करत आहेत. खोट्या बातम्या पेरणाऱ्यांसाठी त्यांनी फेक न्यूज अवार्डही वाटले होते. पण कॅनडातील एका नामांकित टरॉन्टो स्टार या वृत्तपत्राने ट्रम्पचं थापाडे असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी एकदा, दोनदा नाही तर चक्क १ हजार ९२५ वेळा भाषणात थापा मारल्याचा खळबळजनक खुलासा या वृत्तपत्राने केला आहे.

ट्रम्प २० जानेवारी २०१७ राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हापासून १ जुलै २०१८ पर्यंत त्यांनी केलेल्या प्रत्येक भाषणाबद्दल व त्यात नागरिकांना दिलेल्या खोट्या आश्वासनाबद्दल वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. गेल्या १८ महिन्यात ट्रम्प यांनी एकूण १३ लाख ४० हजार ३३० शब्द उच्चारले. त्यात ५.१ टक्के थापा होत्या. हे प्रमाण पाहता २०१७ साली ट्रम्प यांनी केलेल्या भाषणानुसार ते दररोज २.१ टक्के खोटी आश्वासनं द्यायचे. पण हे प्रमाण २०१८ मध्ये वाढून ५.१ झाले आहे. यामधून ट्रम्प जे काही बोलतात त्यातील १४ शब्दांपैकी १ शब्द हा खोटा असतो, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

टरॉन्टो स्टारनुसार ट्रम्प सगळ्यात जास्त खोटे ६४८ वेळा बोलले असून प्रामुख्याने भाषणात त्यांनी या खोट्या शब्दांचा आधार घेतला आहे. तसेच विविध वाहिन्या व कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ३८०, अनवधनाने केलेल्या विधानांमध्ये ३६९, टि्वटरवर ३३० वेळा आणि पत्रकार परिषदेत १९२ वेळा ट्रम्प यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. याव्यतिरिक्त ६ वेळा ते खोटे बोलल्याचे दावा या वृत्तपत्राने केला आहे.