अण्वस्त्रे नष्ट करण्यास उत्तर कोरिया तयार!


सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची  सिंगापूरमधील सैटोसा येथील ‘कँपोला’ हॉटेलमध्ये भेट झाली. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या भेटीत किम यांनी उत्तर कोरियातील अण्वस्त्र नष्ट करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. तर अमेरिकेने उत्तर कोरियाला संरक्षणाची हमी दिली आहे. तसेच दक्षिण कोरियाबरोबर सुरू असलेला संयुक्त युद्धसराव थांबवण्याचे आश्वासनही दिले आहे. दोन्ही नेत्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही केल्या. ही चर्चा यशस्वी झाल्याने दोन्ही देशांत मैत्रीपर्व सुरू झाले असून संभाव्य तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळला आहे. ही भेट सकारात्मक झाल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. तसेच जगभरातूनही या भेटीचे स्वागत करण्यात आले.

एकमेकांची नेहमी निर्भर्त्सना करणारे उत्तर कोरियाचे शासक आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यातील कटुता बाजूला सारत ज एकमेकांची भेट घेतली. उत्तर कोरियातील अण्वस्त्र नष्ट करणे हा या बैठकीचा मूळ उद्देश होता. दोन्ही नेत्यांच्या भेटीत किम यांनी अण्वस्त्र नष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे, तर त्या बदल्यात अमेरिकेने उत्तर कोरियाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच दक्षिण कोरियाबरोबर सुरू असलेला संयुक्त युद्धसराव थांबवून सैनिकांना परत बोलवणार असल्याचे सांगितले. उत्तर कोरियाची ही प्रमुख मागणी अमेरिकेने मान्य केली आहे. या नेत्यांच्या सकारात्मक भेटीमुळे जागतिक शांततेला असलेला धोका टळला असून संभाव्य तिसऱया महायुद्धाचे संकटही टळले आहे.

या भेटीमुळे अमेरिका आणि उत्तर कोरियात ६५ वर्षांनंतर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ड्वाइट आइजनहॉवर यांनी १९५३ पासून ते बराक ओबामा यांच्या २०१६ या कार्यकाळात अमेरिकेच्या ११ राष्ट्रपतींनी उत्तर कोरियाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. आता ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांत मैत्रीपर्व सुरू झाले असून कोरियन बेटांवरील तणाव संपून तेथे शांतता प्रस्थापित होणार आहे.

जगातील मोठी समस्या सुटली

किम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली. त्यांना भेटून मला आनंद झाला. आम्ही दोघे एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडवू शकतो. आमचे संबंध अजून दृढ होतील. युद्ध करणे सोपे असते; मात्र शांतता प्रस्थापित करणे कठीण आणि धाडसी असते. किम यांनी धाडसी निर्णय घेतल्याबाबत त्यांचे कौतुक असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यांच्या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठी समस्या सुटल्याचे त्यांनी सांगितले.

जगाला परिवर्तन दिसेल

आम्ही भूतकाळ विसरून शांततेकडे वाटचाल करत आहोत. आता जगाला परिवर्तन दिसेल असे किम जोग यांनी सांगितले. आमच्या भेटीमध्ये अनेक अडथळे होते. ते पार करत आम्ही मैत्रीच्या पर्वात पदार्पण केले आहे. आमची भेट सायन्स फ्रिक्शन फिल्मप्रमाणे वाटत असल्याचे किम यांनी सांगितले.

किम यांना व्हाइट हाऊसला बोलावणार?

किम जोंग यांना व्हाइट हाऊसमध्ये बोलावणार का, असे ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले, नक्कीच बोलावणार. तुम्ही एकमेकांना भेटणार का असे विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही यापुढे अनेकदा भेटणार आहोत. उत्तर कोरियावरील प्रतिबंध अजूनही कायम आहेत. अण्वस्त्र नष्ट करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.